शासनदरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या अधिकृत दिनांकाची नोंद व्हावी

नेताजी सुभाषचंद्र बोस ( संग्रहीत छायाचित्र )

पुणे – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संशयास्पद मृत्यूविषयीची कुजबुज आजही समाजात कानावर पडते. या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूविषयीची संदिग्धता संपुष्टात आणून शासनदरबारी त्यांच्या मृत्यूच्या अधिकृत दिनांकाची नोंद व्हावी, अशी मागणी अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांनी केली.

धर आणि घोष हे २० वर्षांहून अधिक काळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर संशोधन करत आहेत. येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात अनुज धर आणि चंद्रचूड घोष यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते, असे संशोधनातून त्यांनी मांडले.

‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खरेच मृत्यू झाला होता का कि भारतीय स्वातंत्र्यामध्ये त्यांना सहभागी करून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना मृत घोषित केले ?’, ‘नेताजी स्वातंत्र्यानंतरही जिवंत होते, हे सरकारने कधी मान्य का केले नाही ?’, ‘नेताजी नंतर कोणत्या नावाने वावरत होते आणि भारत सरकारने आतापर्यंत नेताजींसंदर्भात असलेल्या गोपनीय धारिका समोर का आणल्या नाहीत ?’ आदी विषयांवर श्री. धर आणि श्री. घोष यांनी या मुलाखतीत भाष्य केले.