सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरातील उत्सवाला संतांची वंदनिय उपस्थिती

श्रीराम पंचायत मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त सजवलेल्या मूर्ती

सिंधुदुर्ग – प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यात ३० मार्च या दिवशी सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांतून गेले ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभु रामचंद्रांचा जयजयकार, भगवे ध्वज, विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या शोभायात्रा यांमुळे मंगलमय वातावरणाची अनुभूती जिल्हावासियांनी घेतली.

संतांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंस्थापनेच्या कार्यात झोकून द्या !  – ह.भ.प. सदाशिव पाटील, आंदुर्ले

सावंतवाडी तालुक्यात पानवळ, बांदा येथील श्रीराम पंचायतन मंदिरात सकाळी नित्यपूजा आणि अभिषेक, ह.भ.प. सदाशिव पाटील (आंदुर्ले, कुडाळ ) यांचे रामजन्माचे कीर्तन,  रामजन्म सोहळा, तीर्थप्रसाद, दुपारी मुंबई येथील श्री. प्रदीप चिटणीस यांचे ‘भक्ती संगीत’, प.पू. भक्तराज महाराज भजन मंडळ (पर्वरी, गोवा) यांचा भजनांचा कार्यक्रम, सायंकाळी ‘श्रीरामरक्षा स्तोत्र’ आवर्तन आणि ‘श्रीराम’ सामूहिक जप, श्री. शेखर पणशीकर यांचे ‘गीतरामायण’, रात्री स्थानिक ग्रामस्थांची भजने, असे कार्यक्रम झाले. या वेळी प.पू. दास महाराज, त्यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी उपाख्य माई नाईक, सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम, फोंडा, गोवा येथील सनातनचे संत पू. संकेत गुरुनाथ कुलकर्णी यांची वंदनिय उपस्थिती लाभली होती. या वेळी संतांचा सन्मान करण्यात आला.

श्रीरामाच्या पाळण्याला झोका देतांना डावीकडून पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, श्री. गजानन डेगवेकर, प.पू. दास महाराज आणि सद्गुरु सत्यवान कदम

‘हिंदूंनी धर्माचरण सोडल्याने आणि राजकारणी भ्रष्ट झाल्याने आपत्काळ उद्भवला आहे. या काळात टिकून रहाण्यासाठी संतांच्या मार्गदर्शनाखाली प्रखर साधना करून धर्मसंस्थापनेच्या कार्यात झोकून द्या’, असे आवाहन सनातनचे साधक तथा आंदुर्ले, कुडाळ येथील  ह.भ.प. सदाशिव पाटील यांनी या वेळी कीर्तनातून केले.  या उत्सवाला बांदा, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि गोवा राज्य येथून भाविक मोठ्या संख्येने आले होते.

ह.भ.प. सदाशिव पाटील कीर्तन करतांना आणि त्यांच्या डाव्या बाजूला प.पू. दास महाराज (बसलेले) त्यांच्या डाव्या बाजूला सद्गुरु सत्यवान कदम (उभे असलेले) आणि ह.भ.प. सदाशिव पाटील यांच्या उजव्या बाजूला पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक

सावंतवाडी शहरात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने रामजन्मोत्सव झाल्यानंतर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी गीतरामायण आणि दशावतारी नाट्यप्रयोग, असे कार्यक्रम झाले. कुडाळ शहरात श्री कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ तालुक्यात वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, कसाल येथील श्री पावणाई मंदिर, देवगड तालुक्यात जामसंडे, भटवाडी येथील शिवकालीन श्रीराम मंदिर, कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिर, मारुतिवाडी, फोंडाघाट येथील श्री विठ्ठल मंदिर, मालवण तालुक्यातील आचरा येथील संस्थानकालीन श्री रामेश्वर मंदिर यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात काही ठिकाणी सनातनचे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आणि विक्री कक्ष उभारण्यात आले होते. भाविकांचा याला चांगला प्रतिसाद लाभला.