आसाम विधानसभेत गदारोळ : ३ आमदार निलंबित

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याचे प्रकरण !

राहुल गांधी

गौहत्ती- राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्‍वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले. तसेच काँग्रेसचे २ आमदार आणि १ अपक्ष आमदार यांना दिवसभरासाठी निलंबित केले. काँग्रेसचे आमदार विरोध दर्शवण्यासाठी काळे कपडे घालून सभागृहात आले होते.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाला विरोध दर्शवला. ते म्हणाले, ‘‘उद्या न्यायालयाने मला दोषी ठरवले तर भाजपचे आमदार काळे कपडे घालून आंदोलन करणार नाहीत. आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात जाऊ; पण न्यायव्यवस्थेची अवहेलना करणार नाही. ही प्रवृत्ती भारतीय लोकशाहीसाठी योग्य नाही.’’ त्यानंतर सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला.