चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असण्याची शक्यता ! – संशोधन

बीजिंग (चीन) – चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असू शकतो. चंद्रावर जेव्हा धूमकेतू पडतात, तेव्हा काचसदृश गोलाकार पदार्थांची निर्मिती होते. त्यांमध्ये पाणी बनलेले असू शकते, असे मत चीनच्या ‘२०२० चांग’इ-५’ या अवकाश संशोधन मोहिमेच्या वेळी आणलेल्या मातीच्या नमुन्यांचा अभ्यास केल्यानंतर व्यक्त करण्यात आले आहे. ‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

धूमकेतू कोसळल्यानंतर अथवा उल्कापात झाल्यानंतर चंद्राच्या भूमीवर काही मायक्रॉन ते एक मिलिमीटर एवढ्या व्यासाच्या अब्जावधी काचसदृश गोलाकार पदार्थांची निर्मिती होते. जेव्हा चंद्रावर सौर वारे येतात, तेव्हा त्यासमवेत हायड्रोजन आणि प्राणवायूही मोठ्या प्रमाणात येतात. चंद्रावर असलेल्या गोलाकार पदार्थांवरही प्राणवायू असतो. त्यांचे एकत्रीकरण होऊन पाण्याची निर्मिती होते, अशी माहिती ग्रहांशी संबंधित वैज्ञानिक सेन हू यांनी दिली आहे. प्रत्येक काही वर्षांनी या पाण्याची नवनिर्मिती होते, असेही या अभ्यासातून समोर आले आहे.

ब्रिटन येथील ‘ओपन युनिव्हर्सिटी’चे खगोलशास्त्राचे प्राध्यापक महेश आनंद यांनी या संशोधनाला अत्यंत रोचक म्हटले असून हे संशोधन आपल्याला चंद्राविषयी अधिक विश्‍वासार्ह माहिती देण्यासाठी उपयोगी ठरेल, असे म्हटले आहे.