निरोगी हिंदू !

ब्रिटनने वर्ष २०२१ मध्‍ये केलेल्‍या राष्‍ट्रीय जनगणनेमध्‍ये तेथील हिंदू सर्वाधिक निरोगी असल्‍याचे समोर आले. तेथील हिंदूंच्‍या लोकसंख्‍येपैकी ८२ टक्‍के हिंदू निरोगी आहेत. त्‍याबरोबरच हिंदूंमध्‍ये शारीरिक अपंगत्‍व असण्‍याचे प्रमाणही सर्वांत अल्‍प आहे. हिंदू केवळ शैक्षणिक आणि नैतिक मूल्‍ये आदी स्‍तरांवरच नाही, तर आरोग्‍याच्‍या दृष्‍टीनेही अन्‍य देशांतील नागरिकांच्‍या आणि धर्मियांच्‍या तुलनेत अधिक चांगले आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘हे असे का आहे ?’, याचा विचार करण्‍याची आवश्‍यकता आहे. विचारच नव्‍हे, तर या दृष्‍टीने संशोधन करून ते जगासमोर मांडल्‍यास हिंदु धर्माचे महत्त्व आणखी स्‍पष्‍ट होईल. ‘जगाच्‍या पाठीवर हिंदु संस्‍कृती ही अत्‍यंत प्राचीन आहे’, हे जगानेही मान्‍य केलेले आहे. हिंदु संस्‍कृती ईश्‍वरनिर्मित असल्‍याने हिंदु संस्‍कृतीतील प्रत्‍येक गोष्‍ट ही परिपूर्ण आहे. त्‍यानुसार आचरण केल्‍यास सर्वच स्‍तरांवर लाभ होतो. ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपूर्वी दैनंदिन आचरण, आरोग्‍य, संस्‍कार, खाद्यपदार्थ आदींविषयी सर्व ज्ञान समोर ठेवलेले आहे. याचे पालन हिंदूंकडून पूर्वापार केले जात आहे. पूर्वी भारत अखंड होता. म्‍हणजे पश्‍चिमेकडील इराणच्‍या सीमेपासून ते पूर्वेकडील कंबोडियापर्यंत भारत पसरला होता. या सर्व प्रदेशात हिंदु संस्‍कृती नांदत होती; मात्र गेल्‍या काही शतकांत अन्‍य धर्मियांच्‍या आक्रमणांमुळे त्‍यात पालट झाला आहे, हे स्‍वीकारावे लागले. त्‍याचा परिणाम संबंधितांना दिसत आहे. भारतीय संस्‍कृतीमध्‍ये शाकाहाराला अधिक महत्त्व दिले आहे. शाकाहार सात्त्विक असतो आणि सात्त्विकतेमध्‍ये सर्वाधिक शक्‍ती असते. ती केवळ शारीरिक नव्‍हे, तर मानसिक आणि आध्‍यात्मिकही असते. याचा भारतीय नागरिक अनुभव घेत आले आहेत आणि घेत आहेत.

हिंदू जगाच्‍या पाठीवर कुठेही गेले, तरी ते आपली संस्‍कृती सोडत नाहीत. वेळच्‍या वेळी अन्‍न ग्रहण करणे, पथ्‍य पाळणे, व्‍यायाम आणि प्राणायाम करणे, मद्यापासून दूर रहाणे आदी गोष्‍टी कटाक्षाने पाळत आहेत. पूर्वीच्‍या तुलनेत यात आधुनिकीकरण आणि पाश्‍चात्त्यांच्‍या कुसंस्‍कारांमध्‍ये भारतच नव्‍हे, तर जेथे जेथे हिंदू पोचले आहेत, त्‍यांच्‍यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. भारतातही बर्गर, पिझ्‍झा आदींसारखे पदार्थ ग्रहण करणे, उपाहारगृहांमध्‍ये जाऊन खाणे, अधिक तेलकट, तिखट, चमचमीत, अतीगोड यांचे सेवन करणे, यांत वाढ झाली. त्‍यात सध्‍या ‘चिप्‍स’सारख्‍या पदार्थांचेही प्रमाण वाढले आहे. याचा वाईट परिणाम देशातील नागरिकांच्‍या आरोग्‍यावर होत आहे. तरीही अन्‍य धर्मियांच्‍या किंवा संस्‍कृतीचे पालन करणार्‍यांच्‍या तुलनेत हिंदू अद्यापही निरोगी आणि नीतीमान असतात, हे मान्‍य करावेच लागेल. कोरोना महामारीच्‍या काळात जगभरात म्‍हणजे महासत्ता समजल्‍या जाणार्‍या अमेरिकेपासून ते महासत्ता होऊ पहाणार्‍या चीनपर्यंत लाखो लोकांचा मृत्‍यू झाला; मात्र भारत त्‍या तुलनेत आणि लोकसंख्‍येच्‍या मानाने अल्‍प हानी झालेला देश ठरला. हिंदूंचे जीवनमान याला कारणीभूत आहे. हिंदूंच्‍या खाद्यसंस्‍कृतीमध्‍ये रोगप्रतिकारक शक्‍ती आहे. भारतानेच जगाला आयुर्वेद दिला आहे. आजार झाले, तरी आयुर्वेदामध्‍ये त्‍या आजारांशी लढून त्‍यांना मुळापासून दूर करण्‍याची शक्‍ती आहे. त्‍यामुळेच हिंदू अधिक निरोगी असतात. हिंदू मध्‍यंतरी आयुर्वेदापासून दूर गेले होते, शाकाहारापासून दूर गेले होते; मात्र आता ते पुन्‍हा त्‍यांच्‍याकडे वळले आहेत. त्‍यांना यांचे महत्त्व समजू लागले आहे. केवळ भारतच नव्‍हे, तर जगभरातील हिंदूंमध्‍ये आणि काही प्रमाणात अन्‍य धर्मियांमध्‍येही हा पालट होत आहे, हे विशेष ! त्‍याचा परिणाम भविष्‍यात दिसून येईल यात शंका नाही. त्‍यामुळे ब्रिटनमधील हिंदू निरोगी रहाण्‍यामागे हिंदु धर्म आणि त्‍याची संस्‍कृती आहे, हे लक्षात घेऊन त्‍यानुसार आचरण करणे महत्त्वाचे आहे. भारत पूर्वी विश्‍वगुरु का होता, हेही यातून लक्षात येते.

संपादकीय भूमिका

भारतीय संस्‍कृतीनुसार आचरण केल्‍याने हिंदू जगात प्रबळ होतील, हे त्‍यांनी लक्षात ठेवावे !