परशुराम घाट महामार्गाच्या कामासाठी पुन्हा होणार बंद ?

परशुराम घाट

चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. परशुराम घाटातील महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात यावे, या दृष्टीने हा घाटमार्ग एक आठवडाभर (२७ मार्च ते ३ एप्रिल) बंद करावा, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने या संदर्भात चिपळूण महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक विभाग यांच्याकडून याविषयीचा अहवाल मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतरच याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. हा घाट किती दिवस बंद ठेवायचा ? याविषयीचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून पुढील २-३ दिवसांत याविषयीचा निर्णय होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

घाट बंद केल्यानंतर अल्प भारमान असणार्‍या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गे वळवता येईल, तसे आदेश देण्यात यावेत, अशी विनंती अभियंत्यांनी पाठवलेल्या जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.