खराब रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीत टाकणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी, १० सप्टेंबर (वार्ता.) – राज्यातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीमध्ये टाकले जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते बांधणार्‍या कंत्राटदारांना दिली आहे.

ते म्हणाले, ‘‘राज्यातील खराब रस्त्यांविषयी अभ्यास करून अहवाल सिद्ध करण्याचे उत्तरदायित्व ‘इंजिनीयर्स इंडिया’ या आस्थापनाकडे सोपवण्यात आले आहे. याविषयी ‘इंजिनीयर्स इंडिया’ या आस्थापनाकडून अंतिम अहवाल मागवण्यात आला आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर जे रस्ते खराब झाले आहेत, ते संबंधित कंत्राटदारांकडून दुरुस्त करू घेतले जातील.’’

सध्या पणजी शहरात स्मार्ट सिटी योजनेतील रस्त्यांप्रमाणेच इतर मोठ्या शहरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर रस्त्यावरून चालणार्‍या पादचार्‍यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत किरकोळ अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा अपघातांमुळे काही नागरिक घायाळही झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या खराब स्थितीविषयी सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. लोकांच्या या तक्रारींची शासनाने गंभीर नोंद घेतली असून सार्वजनिक बांधकाम खात्याने काही दिवसांपूर्वी रस्ते सिद्ध करणार्‍या काही कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार कंत्राटदारांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.