लोकांच्या भावना दुखावू नयेत; म्हणून कुतूबमीनार परिसरातील देवतांच्या मूर्ती नीट ठेवण्यात याव्यात !

देहलीतील न्यायालयाचा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला आदेश !

कुतुबमिनार परिसरातील हिंदु देवतांच्या मूर्ती
(चित्रावर क्लिक करा)

नवी देहली – कुतूबमीनार परिसरामध्ये हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती अपमानजनक स्थितीमध्ये आहेत, अशी माहिती हिंदु पक्षाकडून येथील साकेत न्यायालयात देण्यात आल्यावर न्यायालयाने ‘लोकांच्या भावना दुखावू नयेत; म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मूर्ती नीट ठेवाव्यात’, असा आदेश दिला. या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी २४ एप्रिल या दिवशी होणार आहे.

१. हिंदु पक्षाचे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन यांनी न्यायालयाला सांगितले की, कुतूबमीनार २७ जैन आणि हिंदु मंदिरे तोडून बांधण्यात आले आहे. यासाठीच आम्ही येथे पूजा करण्याचा अधिकार मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट केली आहे.

२. यावर न्यायालयाने विचारले, ‘आता तेथे असलेले बांधकाम पाडण्याची तुमची इच्छा आहे का ?’ त्यावर अधिवक्ता (पू.) जैन म्हणाले, ‘‘कोणतेही बांधकाम पाडावे, अशी आमची अपेक्षा नाही. हिंदु धर्मानुसार जर मंदिरातील देवतांची प्राणप्रतिष्ठापना केली, तर ते नेहमीच मंदिर रहाते. यामुळेच आम्ही या परिसरात पूजा करण्याचा आमचा पूर्वीचा अधिकार परत मागत आहोत.’’

कुतुबमिनार आणि त्याच्या परिसरातील भगवान विष्णूची पताका असलेला लोहस्तंभ

३. न्यायालयाने विचारले, ‘येथे मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती, याचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत ?’ यावर पू. जैन यांनी सांगितले की, येथे लोहस्तंभ आहे. त्यावर संस्कृत श्‍लोक लिहिण्यात आले आहेत. लोहस्तंभ ही भगवान विष्णूची पताका आहे. आजही कुतूबमीनार परिसरात देवतांच्या मूर्ती आहेत.

लोहस्तंभावर लिहिण्यात आलेले संस्कृत श्‍लोक

संपादकीय भूमिका

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पुरातत्व विभागाच्या हे का लक्षात येत नाही ? नेहमीच हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणारा पुरातत्व विभाग विसर्जित करा !