सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश
मांढरदेव (जिल्हा सातारा) – मांढरगडावरील श्री काळूबाई देवीची यात्रा १२ ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये होत आहे. यात्रा शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपले दायित्व पार पाडावे. यात्रा कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी, असे आदेश सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहेत. ते एम्.टी.डी.सी. भवनामध्ये यात्रेनिमित्त झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
१. दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या गर्दीचे ट्रस्टने व्यवस्थापन करावे. येणारा प्रत्येक भाविकाची यात्रा सुरक्षित झाली पाहिजे.
२. यात्रेत पशुहत्या होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यात्रा काळात पशुपक्षी बळी प्रतिबंध करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे.
३. उपद्रवमूल्य असणार्या शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भरारी पथके नेमावीत.
४. १२ ते १४ जानेवारी हे ३ दिवस यात्रा परिसरात ‘ड्राय डे’ (मद्य विक्रीस प्रतिबंध) घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
५. यात्रा कालावधीमध्ये २४ घंटे अखंडित विद्युत पुरवठा ठेवून मागणीप्रमाणे विद्युत जोडणी द्यावी.