श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मनुष्यबळ पुरवठा करणार्‍या ‘रक्षक सिक्युरिटी’चा ठेका रहित !

वारकर्‍यांना धक्काबुक्की करून ढकलून देण्यासह आस्थापनाकडून अयोग्य वर्तणूक

प्रतिकात्मक चित्र

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी पुणे येथील ‘रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस सिस्टम्स प्रा.लि.’ यांना ४ कोटी ५० लाख रुपये निधी संमत करण्यात आला होता. रक्षक आस्थापनाने नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविक भक्तांना धक्काबुक्की करणे, त्यांना ढकलून देणे, भाविकांशी नम्रतेने न वागणे, कर्मचार्‍यांनी ओळखपत्र परिधान न करणे, मंदिरात प्रवेश करणार्‍या भाविकांची पडताळणी न करता भ्रमणभाषसह मंदिरात प्रवेश देणे यांसह अनेक अटी-शर्तींचा भंग केल्याने त्यांचा ठेका रहित केल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

१. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीला आवश्यकतेनुसार कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ‘ई निविदा’ काढण्यात आली होती. यात ‘रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस सिस्टम्स प्रा.लि.’ यांची निविदा संमत होऊन ४ जुलै २०२४ या दिवशी करारनामा करण्यात आला.

२. या आस्थापनाच्या संदर्भात वारंवार तक्रारी आल्यावर त्यांना वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात योग्य तो खुलासा आणि सुधारणा होत नसल्याचे दिसून आले होते. शेवटी मंदिरे समितीच्या १० डिसेंबर २०२४ या दिवशीच्या सभेत अंतिम नोटीस देऊन लेखी खुलासा आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे ठरले होते. त्यानुसार संबंधित आस्थापनाला अंतिम नोटीस देण्यात आली होती. त्यावर त्यांनी सादर केलेला खुलासा वस्तूस्थितीला धरून आणि समाधानकारक नव्हता.

३. ४ जानेवारीला ‘भटक्या कुत्र्यांचा मंदिरात मुक्त वावर’, असे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यामुळे आस्थापनाकडील कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अंतिमत: हा ठेका रहित करण्यात आला.

संपादकीय भूमिका :

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम दर्शवणारे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिरात ठेका देऊन कर्मचारी न नेमता सेवाभावी भाविक-भक्तांची नेमणूक करणे अपेक्षित आहे. शेगाव देवस्थानामधील कर्मचारी ‘सेवक’ भावात असल्याने ते भाविकांशी नम्रतेने बोलतात आणि सरकारीकरण झालेल्या मंदिरांत वेतनावर नेमणूक केलेले कर्मचारी भाविकांशी अयोग्य वर्तणूक करतात. त्यामुळे ठेका रहित करणे ही वरवरची उपाययोजना असून मंदिरातील देवता, भक्त यांच्याविषयी श्रद्धा आहे, अशांना मंदिर स्वाधीन करणे हाच त्यावर कायमस्वरूपी उपाय आहे !