गेल्या वर्षीच्या तुलनेत ५६८ गुन्हे अल्प !
पुणे – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या गुन्ह्यात यंदा ५६८ ने घट झाली आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी – एम्.आय्.डी.सी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, आळंदी, देहूरोड आदी २३ ठाण्यांचा समावेश आहे. वर्ष २०२३ मध्ये १६ सहस्र ४७७ गुन्ह्यांची नोंद झाली होती. वर्ष २०२४ मध्ये १५ सहस्र ९०९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, बालगुन्हेगारी रोखण्यासाठी सर्व बालगुन्हेगारांची माहिती संकलित करून दिशा उपक्रमांतर्गत गुन्हेगारीतून त्यांचे लक्ष हटवून खेळाकडे आकर्षित केले. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मकोका) ९९ टोळ्यांमधील गुंडांना अटक केली. ५५५ गुन्हेगारांना तडीपार करून ४७ संशयितांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. वाहनचोरीच्या घटना घडतात, त्या भागात पोलीस गस्त वाढवली, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले. या उपाययोजनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण घटले.