शिरोडा ग्रामपंचायत सभागृहाचे ‘माऊली सभागृह’ हे नाव पालटून ‘श्री देवी माऊली सभागृह’, असे करण्याची युवासेनेची मागणी

२६ जानेवारीपर्यंत कार्यवाही न झाल्यास युवासेना नावात पालट करणार

वेंगुर्ला – वर्षानुवर्षे शिरोडा ग्रामपंचायत प्रशासनानाला सूचना करूनही ग्रामपंचायत सभागृहाला देण्यात आलेल्या नावातील त्रुटी दूर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या शिरोडा गावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. येत्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वी म्हणजे २६ जानेवारीच्या आधी सभागृहाच्या नावातील त्रुटी दूर करून ‘श्री देवी माऊली सभागृह’, असे नामकरण करण्यात येईल, असे आश्वासन सरपंच सौ. लतिका रेडकर यांनी ग्रामसभेत दिले.

याविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने ग्रामसभेत निवेदन देण्यात आले होते. देवतांच्या नावाअगोदर ‘श्री’ असा प्रत्यय लावला जातो. शिरोडा ग्रामपंचायत सभागृहाला सध्या ‘माऊली सभागृह’, असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे त्या नावात ‘श्री’, असा उल्लेख केलेला नाही. नावातील ही त्रुटी तात्काळ दूर करून सभागृहाचे नाव ‘श्री माऊली सभागृह’, असे करावे, असे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामसभेत निवेदनाद्वारे सुचवले होते. या निवेदनासोबत रेडी ग्रामपंचायत सभागृहात लावण्यात आलेल्या योग्य नावांचे छायाचित्र माहितीसाठी जोडण्यात आले होते. सरपंच सौ. रेडकर यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दिलेल्या कालावधीत कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताकदिनी
म्हणजे २६ जानेवारी या दिवशी युवासेना योग्य ती कार्यवाही करील, असे ‘शिवसेना शाखा शिरोडा’कडून कळवण्यात आले आहे.