मुंबई – केंद्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. आता तो दर्जा देणारा शासन निर्णय केंद्र सरकारने ८ जानेवारी या दिवशी काढला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हा शासन आदेश स्वीकारला. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतरित्या अभिजात भाषा ठरली आहे.
उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले.
मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन आंतरराष्ट्रीय पातळीवर होण्यासाठी प्रयत्नरत ! – मंत्री उदय सामंत
या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना उदय सामंत म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत. योगायोग म्हणजे ११ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा; म्हणून जो प्रस्ताव पाठवण्यात आला, त्या वेळी मी राज्यातील मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री होतो. आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आणण्याचे भाग्य नियतीने लिहिलेले होते. आता आमचे दायित्व वाढलेले आहे. त्या दायित्वाने काम करून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन केवळ महाराष्ट्रातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे केले जाईल, यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. |