गोवा सरकारची सामाजिक माध्यमांतून अपकीर्ती करणार्‍या ‘टूलकिट’चे मूळ शोधा ! – मंत्रीमंडळ

बैठकीत झाली मागणी

(टूलकिट म्हणजे एखादे षड्यंत्र पुढे रेटण्यासाठी विविध स्तरांवर आखलेली रणनीती)

पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटक आणि भाजप सरकार यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. गोवा सरकारची ८ जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळ बैठक झाली. यामध्ये पर्यटनक्षेत्राविषयी चर्चा झाली. ‘टूलकिट’द्वारे अन्य राज्यांमध्ये
गोव्याला अपकीर्त केले जात आहे, असे सूत्र बैठकीत मांडण्यात आले आणि या ‘टूलकिट’चे मूळ शोधण्याची मागणीही बैठकीत झाली. देशपातळीवरील एका पत्रकाराने गोवा सरकारच्या अपकीर्तीसाठी एक ‘टूलकिट’ कार्यरत असल्याचा दावा केला होता. संबंधित पत्रकाराने ‘एक्स’ या समाजिक माध्यमावर याविषयी खुलासा केला आहे. हल्लीच गोव्यात नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष यांसाठी पर्यटकांची संख्या अल्प झाल्याचा दावा सामाजिक माध्यमांतून करण्यात आला होता, तर सरकारच्या वतीने हा दावा खोडून काढण्यात आला. गोव्यात नाताळ आणि ख्रिस्ती नववर्ष या काळात नेहमीप्रमाणे पर्यटक मोठ्या संख्येने आल्याचे सरकारने सांगितले होते.

गोवा सरकारने सामाजिक माध्यमांद्वारे प्रचार करण्यासाठी १० मासांत ८ लाख रुपये केले खर्च

पणजी – गोवा सरकारने सामाजिक माध्यमाद्वारे गोव्याचा सकारात्मक प्रचार करण्यासाठी १० मासांत ८ लाख रुपये केले खर्च केले आहेत. सरकारच्या धोरणांचा प्रचार करणे, सरकारचे विविध कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आदींचा प्रसार करणे यांसाठी एकूण ३६ गोमंतकीय नागरिक काम करत होते आणि त्यांनी १६ सरकारी प्रकल्पांविषयी प्रसार केला.