कोची (केरळ) – महिलेच्या शरिराची रचना (फिगर) यावर टिप्पणी करणे लैंगिक छळाच्या बरोबरीचे आहे, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्यावर सुनावणी करतांना म्हटले. केरळ राज्य विद्युत् मंडळाच्या कार्यालयात काम करणार्या महिला कर्मचार्याने प्रविष्ट (दाखल) केलेला लैंगिक छळाचा गुन्हा रहित करण्याची मागणी याच कार्यालयात काम करणार्या आरोपीने केली होती. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
महिलेने आरोप केला होता की, आरोपीने वर्ष २०१३ पासून तिच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली आणि त्यानंतर वर्ष २०१६-१७ मध्ये आक्षेपार्ह संदेश पाठवण्यास चालू केले. पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आल्यानंतरही तो आक्षेपार्ह संदेश पाठवत राहिला. आरोपीच्या वतीने अधिवक्त्याने न्यायालयात युक्तीवाद करतांना केवळ आकृतीबंधावर भाष्य केले. हा लैंगिक छळ मानू नये आणि त्याच्यावरील खटला रहित करण्यात यावी, असे अधिवक्त्याने विनंती केली. यावर न्यायालयाने म्हटले की, आरोपीचा उद्देश महिलेला त्रास देणे आणि तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणे हा होता.