पिंपरी – जाहिरात फलकाच्या एका अनुमतीवर अनेक ठिकाणी जाहिरात फलक लावले जात असल्याने त्याची ऑनलाईन अनुमती बंद केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी यासंदर्भातील आदेश दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नियमातील तरतुदीअन्वये महापालिकेची पूर्व अनुमती घेऊनच महापालिकेच्या, तसेच खासगी जागेत जाहिरात फलक उभा करण्यास अनुमती देण्यात येत होती; मात्र प्रत्यक्षपणे या पद्धतीचा अपवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
व्यावसायिक एक अनुमती घेऊन त्यांच्या झेरॉक्स काढून अनेक जागांवर जाहिरात फलक लावत आहेत. (व्यावसायिकांनी असे करण्याची हिंमत करणे गंभीर आहे. हे सर्व प्रशासनाच्या एवढ्या विलंबाने कसे लक्षात आले ? – संपादक)
यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जाहिरात अनुमती देण्याचा आदेश रहित केला आहे. यापुढे संपूर्ण शहरात ऑनलाईन पद्धतीने तात्पुरते जाहिरात फलक लावण्यास अनुमती नाही; मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये तसेच शासकीय कार्यक्रमानिमित्त जाहिरात लावण्यास अनुमती देण्यात येईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.