सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सुश्री (कु.) आरती तिवारी यांनी घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे

१. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के)

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर

१ अ. श्रीरामनवमीच्‍या दिवशी सहस्र पटींनी कार्यरत असणारे प्रभु श्रीरामाचे चैतन्‍य भावजागृतीच्‍या प्रयोगाच्‍या वेळी अनुभवता येणे : रामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजलताईने भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्‍या दिवशी सहस्र पटींनी कार्यरत असणारे प्रभु श्रीरामाचे चैतन्‍य प्रत्‍यक्षात ताईच्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगात अनुभवायला मिळाले. ताईचा स्‍वतःचाही भाव जागृत झाला होता आणि तिने या भावजागृतीच्‍या प्रयोगात तळमळीने अन् आतुरतेने प्रभु श्रीरामरूपी गुरुमाऊलीच्‍या चरणी कळकळीची प्रार्थना केली, ‘माऊली, आम्‍हाला केवळ तुमच्‍या कृपेमुळे साधना लाभली आहे. आम्‍हाला काहीच येत नाही. तुम्‍हीच आमच्‍याकडून साधनेचा प्रत्‍येक प्रयत्न करून घ्‍या आणि आम्‍हाला अखंड तुमच्‍या चरणी ठेवा. कितीही तीव्र आपत्‍काळ आला, तरीही ‘तुमचे चरण, हेच आमचे अखंड ध्‍यान असेल’, असे करा.’

१ आ. भावप्रयोगातून गुरुमाऊलीच्‍या निर्गुण अस्‍तित्‍वाची जाणीव होणे : भावजागृतीच्‍या प्रयोगाच्‍या वेळी ताईने तळमळीने मारलेली हाक ऐकून ‘जणू गुरुमाऊली श्रीरामाच्‍या रूपात प्रयोगाच्‍या ठिकाणी उभी आहे, असे मला जाणवले. त्‍यांचे ते रूप पाहून आम्‍ही भावविभोर झालो. तेव्‍हा ‘आम्‍हाला काहीच नको, केवळ त्‍यांचे चरण हवेत’, असे वाटत होते. प्रयोगाच्‍या शेवटी ताईने भावपूर्ण काव्‍य गायले. त्‍यानंतर आम्‍हाला गुरुमाऊलीच्‍या निर्गुण अस्‍तित्‍वाची तीव्रतेने जाणीव झाली. ‘त्‍या स्‍थितीतच रहावे, त्‍यातून बाहेर येऊ नये’, असे मला वाटले. या भावजागृतीच्‍या प्रयोगातून खरोखरच माऊलीच्‍या निर्गुण अस्‍तित्‍वाची अलौकिक जाणीव झाली.

२. होमिओपॅथी वैद्या  सुश्री (कु.) आरती तिवारी 

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

२ अ. रामनाथी आश्रम श्रीरामतत्त्वाने भारित झाला असल्‍याचे जाणवून गुरुमाऊलीचे दर्शन झाल्‍यावर अपराधीभाव जागृत होणे : कु. आरतीताईने रामनाथीरूपी अयोध्‍येमध्‍ये आम्‍हा सर्व साधकांना हळूवार नेले. तेव्‍हा ‘रामनाथी आश्रम श्रीरामतत्त्वाने भारित झालेला आहे’, याची आम्‍हाला अनुभूती आली. आम्‍ही सर्वांनी अयोध्‍येतील शरयू नदीवर स्नान केले आणि शरयू मातेने आम्‍हाला अंतर्बाह्य शुद्ध केले. आम्‍ही महाप्रवेशद्वाराच्‍या दिशेने गेलो आणि गुरुमाऊलीपर्यंत पोचलो अन् तेथे आम्‍हाला गुरुमाऊलीचे दर्शन झाले. तेव्‍हा माझा भाव जागृत झाला. ‘माझ्‍याकडून फार गंभीर चुका होतात. माझी साधनेची स्‍थिती नीट नाही, तरीसुद्धा गुरुमाऊली मला दर्शन देत आहे. ती माझ्‍या समवेत आहे आणि ती माझ्‍यावर अखंड कृपा करत आहे’, असे मला वाटले.

एकूणच आढाव्‍याच्‍या वेळी होणार्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांमुळे सर्वांमध्‍ये साधनेचे प्रयत्न करण्‍याचे गांभीर्य वाढले. ‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेच्‍या अंतर्गत अनियमित लिखाण, स्‍वयंसूचनांची अपूर्ण सत्रे, अपूर्ण नामजपादी उपाय’, अशा आमच्‍या चुका लक्षात यायला लागल्‍या आणि त्‍यावर प्रयत्न व्‍हायला लागले. या भावजागृतीचा प्रयोगांमुळे आमची अंतर्मुखता वाढली. आमची साधनेची तळमळ न्‍यून पडत होती, तीही वाढायला साहाय्‍य झाले. गुरुमाऊलींच्‍या कृपेनेच साधना वाढण्‍याच्‍या दृष्‍टीने भावजागृतीच्‍या प्रयोगांचा लाभ होत आहे. त्‍यासाठी गुरुमाऊलीच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. शुभांगी शेळके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक