सातारा, २० मार्च (वार्ता.) – ३ मार्च २०२३ पासून मुघलांचे उदात्तीकरण करणारी ‘ताज : डिव्हायडेड बाय लव्ह’ ही वेब सिरीज झी-५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू आहे. याचे कथानक मुघल राज अकबर आणि त्याच्या ३ मुलांमध्ये झालेले युद्ध आणि क्रूरता यांवर आधारीत असल्याचे ट्रेलरद्वारे दिसून येते. मोघलांनी केलेल्या अत्याचारावर नव्हे, तर त्यांचा परिवार, राजकारण, व्यक्तीमत्त्व आदी गोष्टींवर प्रकाश टाकणारी वेब सिरीज प्रदर्शित करणे, हे त्यांचे उदात्तीकरणच आहे. ज्या मोघलांनी हिंदु धर्म संपवण्याचा, हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा, हिंदूंचा वंशविच्छेद करण्याचा प्रयत्न केला अशा मोघलांवर वेब सिरिज काढणे, म्हणजे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे मुघलांचे उदात्तीकरण करणार्या ‘ताज : डिव्हायडेड बाय लव्ह’ या वेब सिरीजवर बंदी घाला, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे भारत सरकारकडे करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ मार्च या दिवशी गोलबाग, राजवाडा येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. २० मार्च यादिवशी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी इस्कॉनचे प्रमोद रसाळ, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुरेश पंडित, शंकर पवार, चंद्रकांत महाडिक आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, वेब सिरीजमध्ये अकबर सहिष्णू होता, ग्रेट होता, सम्राट होता, असे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्याचा इतिहास क्रूर होता. अकबरचा जन्म पाकिस्तानात, त्याचे वडील हुमायूं याचा जन्म अफगाणीस्तान, तर आजोबा बाबरचा जन्म उझबेकीस्तान येथे झाला. त्यामुळे जे भारतीय नाहीत त्यांच्यावर वेब सिरीज काढणे, हेच मुळात परकीयांचे उदात्तीकरण असून संतापजनक आहे. बाबराने अयोद्धेतील श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद उभी केली. हीच श्रीराम जन्मभूमी पुन्हा मिळवण्यासाठी ५०० वर्षांचा अतिशय संघर्षपूर्ण काळ गेला. त्यामुळे अशा क्रूरकर्मा अकबराच्या वेब सिरीजवर बंदी घालण्यात यावी.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? |