पुणे – पुणे येथील वाहतुकीची समस्या सोडवण्याकरता केवळ उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारणे हे पर्याय पुरेसे नाहीत. कोंडी सोडवण्याकरता खासगी वाहनांना प्रोत्साहन देणे टाळायला हवे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल, असे घडले तरच ही समस्या सुटेल, असे मत ‘परिसर संस्थे’चे कार्यक्रम संचालक आणि वाहतूकतज्ञ रणजित गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.
गाडगीळ यांनी सांगितले की, लोकांनी अधिकाधिक सार्वजनिक सेवेचा वापर करावा, यासाठी बसेसची संख्या वाढवावी लागेल. लोकांना घरातून बाहेर पडल्यानंतर ५ ते ७ मिनिटांमध्ये बस थांबा गाठता यायला हवा, तसेच थांब्यावर पोचल्यावर ५ मिनिटाच्या अंतराने बस उपलब्ध हव्यात. बस किती वेळात येणार आणि ती सध्या कुठे आहे याची माहिती देणारी यंत्रणा उभी करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा असा सक्षम पर्याय आपण दिल्यास निश्चित रस्त्यावरील वाहनांची संख्या अल्प करण्यात आपण यशस्वी होऊ. सध्या पुणे शहरात २ लाख लोकांमागे केवळ ३० बस असे प्रमाण आहे. हे प्रमाण वाढवायला हवे.