गोवा : कारका (बांबोळी) येथे मासेमारांच्या ४ होड्या आगीत जळून खाक : लाखो रुपयांची हानी

अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी, २० मार्च (वार्ता.) – कारका-बांबोळी येथील समुद्रकिनार्‍यावर ठेवलेल्या पारंपरिक मासेमारांच्या ४ होड्या २० मार्चला पहाटे आगीत जळून खाक झाल्या. यामागे काहीतरी घातपात असल्याचा संशय या होड्यांच्या मालकांनी व्यक्त केला असून होड्यांना आग लागण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेमध्ये जवळपास ३ लाख रुपयांची हानी झाली आहे. या घटनेविषयी आगशी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मध्यरात्रीनंतर ही आग लागली असावी, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. ही आग मोठ्या प्रमाणात पेटल्याने स्थानिक लोकांना काहीच करता आले नाही. आगीत जळून खाक झालेल्या होड्यांपैकी २ लाकडी, तर २ होड्या फायबरच्या आहेत. गवताला आग लागून ती होड्यांना लागली, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे; मात्र या होड्यांच्या मालकांनी या आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ‘अनेक होड्या रांगेत समुद्रकिनार्‍यावर होत्या, तर मग या चार होड्यांनाच आग कशी लागली ?’, असा त्यांचा प्रश्न आहे. पोलिसांनी होड्यांच्या मालकांच्या, तसेच तेथील काही स्थानिक लोकांच्या जबान्या नोंदवण्याचे काम चालू केले आहे. सांताक्रूझ पंचायतीच्या सरपंच जेनिफर ओलिव्हेरा, उपसरपंच व्हिनासिओ डॉम्निक परेरा यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. या पंचायतीच्या ८ पंचसदस्यांनी त्यांचे एक मासाचे मानधन हानीग्रस्तांना देणार असल्याचे घोषित केले आहे.