सोलापूर शहरात गुढीपाडव्‍याला २ ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन !

पत्रकार परिषदेला उपस्‍थित (डावीकडून चौथे) श्री. रंगनाथ बंग आणि उपस्‍थित समितीचे पदाधिकारी

सोलापूर, २० मार्च (वार्ता.) – येथे गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी हिंदु नववर्ष समितीच्‍या वतीने शहरात २ ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्‍यात आले आहे. बाळीवेस येथून पहिली शोभायात्रा, तर जुळे सोलापूर येथील आसरा चौकातून दुसरी शोभायात्रा दुपारी ४.३० वाजता निघेल, अशी माहिती समितीचे संस्‍थापक रंगनाथ बंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी समितीचे अध्‍यक्ष पेंटप्‍पा गड्डम, कोषाध्‍यक्ष नितीन कारवा, तसेच ज्ञानेश्‍वर म्‍याकल, चिदानंद मुस्‍तारे, अधिवक्‍त्‍या शर्वरी रानडे उपस्‍थित होते.

बाळीवेस येथून निघणारी शोभायात्रा चार हुतात्‍मा पुतळा येथे समाप्‍त होईल, तर जुळे सोलापुरातील शोभायात्रा केएल्‌ई शाळेच्‍या मैदानात समाप्‍त होईल. या शोभायात्रेमध्‍ये सोलापुरात क्रीडा क्षेत्रात प्राविण्‍य मिळवलेल्‍या खेळाडूंचा चित्ररथ असेल. यासमवेतच मिरवणुकीत वाद्यपथक, भव्‍य ढोल पथक सहभागी होणार आहे. विविध चित्ररथ शोभायात्रांचे आकर्षण रहाणार आहेत.