इम्रान खान बाहेर पडताच प्रवेशद्वार तोडून त्यांच्या घरात घुसले पोलीस !

  • इस्लामाबाद न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी इम्रान खान मार्गस्थ !

  • पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या झटापट

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान (उजवीकडे)

लाहोर (पाकिस्तान) – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्यावरील खटल्यांच्या सुनावणीसाठी इस्लामाबाद येथील न्यायालयात जात असतांना त्यांना टोलनाक्याजवळ रोखण्यात आले. इम्रान खान लाहोर येथील घरातून निघताच पोलिसांनी घराचे प्रवेशद्वार बुलडोजरने पाडून आता प्रवेश केला. या वेळी पोलिसांची इम्रान त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी झटापटही झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. या घटनेविषयी इम्रान खान यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून म्हटले की, पोलीस माझ्या अनुपस्थितीत माझ्या घरी पोचले आहेत. माझी पत्नी घरी एकटी होती. ही कारवाई कोणत्या कायद्यान्वये केली जात आहे ? हे सर्व नवाझ शरीफ यांच्या कटाचा भाग आहे, असा आरोपही खान यांनी केला.

१. इम्रान खान इस्लामाबादकडे जातांना कल्लर कहरजवळ त्यांच्या ताफ्यातील ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या. वेग अधिक असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अनेक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. या अपघातानंतर खान म्हणाले की, मला रोखण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना मला अटक करायची आहे. हा सर्व ‘लंडन योजने’चा भाग आहे. मला कारागृहात टाकावे, अशी नवाझ शरीफ यांची मागणी आहे. मी कोणत्याही निवडणुकीत भाग घ्यावा, असे त्यांना वाटत नाही. माझा कायद्यावर विश्‍वास आहे, त्यामुळे मी न्यायालयात उपस्थित रहाणार आहे.

२. आदल्या दिवशी इम्रान खान लाहोर उच्च न्यायालयात उपस्थित राहिले होते. तेथे त्यांना ९ प्रकरणांमध्ये संरक्षणात्मक जामीन मिळाला. इस्लामाबादमध्ये चालू असलेल्या ५ खटल्यांसाठी न्यायालयाने खान यांना २४ मार्चपर्यंत जामीन संमत केला आहे.