विमा नाकारलेल्या शेतकर्‍यांच्या प्रस्तावांची पुनर्पडताळणी करण्यात येईल ! – अब्दुल सत्तार, कृषीमंत्री

अब्दुल सत्तार, कृषीमंत्री (सौजन्य. ABP Majha) 

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – ज्या हानीग्रस्त शेतकर्‍यांचे प्रस्ताव विमा आस्थापनांनी फेटाळले आहेत, त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या प्रस्तावांची पुनर्पडताळणी करण्यात येईल. येत्या १५ दिवसांत याविषयीचा अहवाल मागवण्यात येईल, असे आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिले. शेतकर्‍यांना पिकविम्याचे पैसे मिळावे, यासाठी सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

यामध्ये विमा आस्थापन दोषी आढळल्यास त्यांवर कारवाई करण्यात येईल. एकही हानीग्रस्त शेतकरी साहाय्यापासून वंचित रहाणार नाही. जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी पडताळणी केल्याविना कोणत्याही शेतकर्‍याचा प्रस्ताव नाकारण्यात येणार नाही. विलंबाने अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांनाही साहाय्य केले जाईल. ही केंद्र सरकारची योजना असल्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून जाचक अटी शिथिल करण्याचे आवाहन करू, असे या वेळी अब्दुल सत्तार यांनी सांगितले.