पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ !

नवी देहली – पाकिस्तानमध्ये वर्ष २०२२ मध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्या अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष २०२२ मध्ये अशा घटनांत एकूण ६४३ लोकांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये ही संख्या २९२ होती, म्हणजे त्यात १२० टक्के वाढ झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनामिक्स अँड पीस’च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पाकच्या तुलनेत अफगाणिस्तानात अशा घटनांत मृत्यू झालेल्याची संख्या अल्प आहे.

एका अहवालानुसार, वर्ष २००७ ते २०२२ पर्यंत पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांत १४ सहस्र १२० लोकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानमधील अफगाणिस्तान सीमाभागांत आतंकवादी घटना अधिक घडल्या आहेत. वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानमधील ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’कडून करण्यात येणार्‍या आक्रमणांत ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘इस्लामिक स्टेट खोरासान’चा प्रभाव पाकिस्तानमध्येही वाढत आहे. या आतंकवादी संघटनेने वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानमध्ये २३ आतंकवादी आक्रमणे केली, ज्यामध्ये ७८ लोकांचा मृत्यू झाला.

आतंकवादी आक्रमणात मरणार्‍यांच्या संख्येविषयीच्या सूचीत बुर्किनी फासो हा आफ्रिकेतील देश पहिल्या क्रमांकावर आहे. वर्ष २०२२ मध्ये बुर्किनी फासोमध्ये आतंकवादी आक्रमणांत १ सहस्र १३५ लोकांचा मृत्यू झाला होता, तर वर्ष २०२१ मध्ये ७५९ जणांचा मृत्यू झाला होता.

संपादकीय भूमिका

पाकने जे पेरले, तेच उगवले !