डोंबिवलीतील नववर्ष स्‍वागतयात्रेसाठी ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्‍पना कार्यान्‍वित !

श्री गणेश मंदिर संस्‍थान, डोंबिवली

ठाणे, १५ मार्च (वार्ता.) – येथील श्री गणेश मंदिर संस्‍थानच्‍या वतीने आयोजित स्‍वागत यात्रेचे हे २५ वे वर्ष आहे, तसेच गणेश मंदिराच्‍या स्‍थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा अनोखा योग साधून अनेक धार्मिक, सामाजिक, सांस्‍कृतिक कार्यक्रमांची वर्षभरातील कार्यक्रमांची आखणी मंदिर संस्‍थानच्‍या वतीने केली जात आहे. नववर्ष स्‍वागत यात्रेनिमित्त यावर्षी ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्‍पना घेऊन स्‍वागत यात्रेचे नियोजन करण्‍यात आले आहे. हिंदु धर्म-संस्‍कृतीच्‍या व्‍यापक रूपाचे प्रतिबिंब चित्ररथ, दिंड्या, देखावे या माध्‍यमांतून प्रदर्शित केले जाणार आहे.

जगभरात चालू असलेल्‍या घटना आणि घडामोडी या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पुढाकाराने ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार जगभर मांडला जात आहे. ही संकल्‍पना घेऊन यावर्षी नववर्ष स्‍वागत यात्रेचे नियोजन करण्‍याचा निर्णय श्री गणेश मंदिर संस्‍थानने घेतला आहे. नववर्ष स्‍वागत यात्रेसाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करण्‍यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्‍हाण हे डोंबिवलीचे स्‍थानिक आमदार म्‍हणून त्‍यांचा स्‍वागत यात्रेतील सहभाग सक्रीय आहे. निसर्ग, पर्यावरण संवर्धन, जल संवर्धन, कचरा मुक्‍त अभियान, असे विविध विषय घेऊन सामाजिक संदेश देणारे तसेच सामाजिक, सांस्‍कृतिक, साहित्‍यिक आणि आध्‍यात्‍मिक संस्‍थांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.

स्‍वागत यात्रेनिमित्त महिला, युवा आणि विद्यार्थी गटासाठी ३ गटांमध्‍ये कौशल्‍य, क्षमता सिद्ध करणार्‍या विविध स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत. ‘यूट्यूबसाठी रिल्‍स, तसेच लघुपट स्‍पर्धा हे या स्‍पर्धेचे विशेष असणार आहे’, असे संयोजकांनी सांगितले. स्‍वागत यात्रा पूर्वसंध्‍या कार्यक्रमांचा शुभारंभ प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरी महाराजांच्‍या उपस्‍थितीत होणार आहे.

स्‍वागत यात्रेनिमित्त आठवडाभर श्रीराम नाम जप यज्ञ, सामुदायिक गीता पठण, अथर्वशीर्ष पठण, दीपोत्‍सव, विविध प्रांतांमधील महिलांची भजने, पाककला स्‍पर्धा, गीत-रामायण कार्यक्रम, महारांगोळी, दुचाकी फेरी, प्रभु रामचंद्रांच्‍या जीवनावरील नृत्‍याविष्‍कार, छत्रपती संभाजी महाराजांच्‍या बलीदान दिनानिमित्त व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे, असे श्री गणेश मंदिर संस्‍थानच्‍या अध्‍यक्षा अलका मुतालिक यांनी सांगितले.