गोवा राज्य सर्वसमावेशक ‘वन आग व्यवस्थापन योजना’ सिद्ध करणार ! – वनमंत्री विश्वजीत राणे

पणजी, १४ मार्च (वार्ता.) – यापुढे वनक्षेत्रांना आग लागू नये, तसेच आग लागल्यास ती नियंत्रणात आणता यावी, यासाठी गोवा सरकार सर्वसमावेशक ‘वन आग व्यवस्थापन योजना’ सिद्ध करणार आहे, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले,

‘‘५ मार्चपासून वनक्षेत्रांना ७१ ठिकाणी आग लागली आणि ती नंतर विझवण्यात आली. गोव्यातील आग दुर्घटनांवरून १४ मार्च या दिवशी राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण; केंद्रीय गृह मंत्रालय; केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान पालट खाते, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल आदींची आढावा बैठक झाली.

बैठकीत राष्ट्रीय वन आग प्रतिबंधक आणि व्यवस्थापन योजनेमध्ये गोवा राज्याला समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. केंद्रीय गृह मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण हे संयुक्तपणे ही योजना सिद्ध करत आहेत. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने आग लागलेल्या वनक्षेत्रांची पहाणी करून आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची सूचना वन खात्याला केली आहे.’’


‘फायर लाईन’ म्हणजे काय ?, ते पहा

 (सौजन्य : Audiovisual Learning Materials -Forests & Wildlife)

संपादकीय भूमिका

  • तहान लागल्यावर विहीर खणतात, त्याप्रमाणे आग लागल्यावर योजना सिद्ध करणे अपेक्षित नाही !
  • उन्हाळ्यात वनक्षेत्रांना आग लागू नये, यासाठी हिवाळ्यात वनांमध्ये ‘फायर लाईन’ सिद्ध केली जाते. यंदा वन खात्याने अभयारण्यात ‘फायर लाईन’ सिद्ध केली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याचेही वनमंत्र्यांनी अन्वेषण करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
  • आग न लागण्यासाठीच्या पूर्वसिद्धतेची कार्यवाही न करणारे वन खाते नवीन योजना कार्यवाहीत आणणार का ?