पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे पती श्री. रविचंद्रन् हे विमानतळाच्या प्रसाधनगृहात जात असतांना पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होऊन नंतर ते विमानात बेशुद्ध पडले. या गंभीर स्थितीतूत ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळेच वाचले.
१. विमानतळाच्या प्रसाधनगृहात जात असतांना पडल्यामुळे यजमान श्री. रविचंद्रन् यांच्या खांद्याला पुष्कळ दुखापत होणे
‘मी आणि माझे यजमान श्री. रविचंद्रन् मोसूर राजगोपाल (वय ६२ वर्षे) कॅनडा येथे आमच्या मोठ्या मुलीकडे गेलो होतो. २.११.२०२२ या दिवशी माझे यजमान कॅनडाहून फ्रँकफर्ट (जर्मनी) मार्गे चेन्नईला जायला निघाले. मी जानेवारी २०२३ मध्ये चेन्नईला जाणार असल्याने ते एकटेच भारतात परत चालले होते. ते फ्रँकफर्ट येथील विमानतळाच्या प्रसाधनगृहात जात असतांना पडले आणि त्यांच्या खांद्याला पुष्कळ मोठी दुखापत झाली. त्यांचा डावा खांदा, हात आणि चेहरा यांवर पुष्कळ जखमा झाल्या. त्यांना पुष्कळ वेदना होत होत्या.
२. एका अनोळखी तमिळ सहप्रवाशाने श्री. रविचंद्रन् यांना साहाय्य करणे
एका अनोळखी तमिळ प्रवाशाने (श्री. बालसुब्रह्मण्यम्, चेन्नई यांनी) त्यांना साहाय्य केले. त्यांनी यजमानांना ‘आयोडेक्स’ लावले आणि ‘पॅरॅसिटॅमॉल’ची एक गोळी दिली. ते कसेबसे पुन्हा विमानात चढले. त्यांनी ‘इन्सुलिन’च्या नियमित मात्रेपेक्षा केवळ अर्धीच मात्रा घेतली होती; परंतु पुष्कळ थकवा आणि गोळीचा परिणाम यांमुळे त्यांना झोप लागली.
३. विमानातच श्री. रविचंद्रन् रक्तातील साखरेची पातळी न्यून होऊन बेशुद्ध होणे आणि विमान मुंबई येथे थांबवून त्यांना रुग्णालयात भरती करावे लागणे
फ्रँकफर्ट येथून चेन्नईला जातांना यजमानांच्या रक्तातील साखरेची पातळी न्यून होऊन ते बेशुद्ध झाले. तेव्हा विमानातील काही आधुनिक वैद्यांनी त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला; पण ते शुद्धीवर येत नसल्याचे पाहून त्यांनी ‘ही वैद्यकीय आणीबाणी आहे’, असे सांगितले. त्यामुळे ३.११.२०२२ या दिवशी मध्यरात्री विमान मुंबईला थांबवण्यात आले. मुंबईला विमानतळाचे व्यवस्थापक श्री. कुणाल यांनी तत्परतेने यजमानांना ‘नानावटी मल्टीस्पेशालिटी’ रुग्णालयात भरती केले. तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी १३ मिलीग्रॅम प्रती डेसीलिटर, एवढी न्यून झाली होती. (‘निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची सर्वसाधारण पातळी ९० ते १०० मिलीग्रॅम प्रती डेसीलिटर, एवढी असते.’- संकलक) माझा भाऊ श्री. गणेश राधाकृष्णन् तातडीने मुंबईला गेला.
४. आधुनिक वैद्यांनी ‘रक्तातील साखर न्यून झाल्यास मेंदूतील पेशींना इजा पोचून रुग्ण अधिक कालावधीसाठी बेशुद्धावस्थेत (‘कोमा’मध्ये) जाऊ शकतो’, असे सांगणे
यजमानांचा ‘एम्.आर्.आय.’ (टीप) अहवाल दोषरहित होता. असे असले, तरी आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘यांची प्रकृती अतिशय गंभीर असून आपल्याला ४८ घंटे थांबून ते शुद्धीवर येण्याची वाट पहावी लागेल. रक्तातील साखर एवढ्या प्रमाणात न्यून झाल्यास मेंदूतील पेशींना इजा पोचते. त्यामुळे रुग्ण अधिक कालावधीसाठी बेशुद्धावस्थेत (‘कोमा’मध्ये) जाऊ शकतो.’’ त्यांनी आवश्यकता वाटल्यास यजमानांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यासाठी आणि अन्न भरवण्यासाठी गळ्यातून एक नळी घालण्यासाठी आमची अनुमती मागितली. या सर्व परिस्थितीमुळे आम्ही पुष्कळ घाबरलो.
टीप – Magnetic Resonance Imaging – हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.
५. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सर्व सांगितल्यावर त्यांनी श्री. रविचंद्रन् यांच्यासाठी सलग ४ घंटे बसून नामजप करणे
मी कॅनडामध्येच होते. मी दुसर्या दिवशी संध्याकाळच्या विमानाने मुंबईला जायला निघणार होते. मी त्वरित सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना संपर्क केला आणि त्यांना सर्व सांगितले. त्यांनी ‘मी कोणता नामजप करावा ?’, याविषयी मला मार्गदर्शन केले. आम्ही श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्याशीही याविषयी बोललो. ‘माझ्या यजमानांना बरे वाटावे’, यासाठी सद़्गुरु गाडगीळकाकांनी सलग ४ घंटे बसून नामजप केला.
६. दुसर्याच दिवशी सकाळी श्री. रविचंद्रन् शुद्धीवर आल्यावर ‘तुम्ही एका दिवसात शुद्धीवर येऊन बोलणे’, हा चमत्कार आहे’, असे सांगून आधुनिक वैद्यांनी आश्चर्य व्यक्त करणे
दुसर्या दिवशी (४.११.२०२२ या दिवशी) सकाळी भाऊ श्री. गणेश याने आम्हाला भ्रमणभाष करून आनंदवार्ता दिली, ‘रविअण्णा शुद्धीवर आले आहेत. त्यांनी आम्हाला ओळखले असून ते आमच्याशी बोलले.’ माझे मोठे जावई श्री. सुदर्शन आणि मी दुसर्या दिवशी (५.११.२०२२ या दिवशी) मध्यरात्री मुंबईला पोचलो. आधुनिक वैद्या यजमानांना म्हणाल्या, ‘‘तुम्ही एका दिवसात बोलू शकाल’, अशी आम्ही अपेक्षाच केली नव्हती. खरंच हा चमत्कार आहे.’’ यजमानांना अत्यंत गंभीर परिस्थितीत रुग्णालयात आणले होते. तेव्हा आरंभी तेथील काही परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांनी त्यांना तपासले होते. त्यांनाही ‘ही एक असामान्य घटना आहे’, असे जाणवले. आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘त्यांच्या डाव्या खांद्याचे हाड मोडले आहे.’’ तेव्हा आम्ही त्यांना सांगितले, ‘‘त्यांच्या नेहमीच्या आधुनिक वैद्यांकडून आम्ही त्यांच्या खांद्यावरील उपचार करून घेऊ.’’ त्यानंतर आम्ही चेन्नई येथे जायला निघालो आणि ८.११.२०२२ या दिवशी रात्री आम्ही चेन्नई येथे पोचलो.
७. ‘श्री. रविचंद्रन् लगेच शुद्धीवर येणे’ हा चमत्कार नसून केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आहे’, असे जाणवणे
आम्ही साधना करत असल्यामुळे ‘हा चमत्कार नसून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आहे’, हे आम्हाला ठाऊक आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एका तमिळ सहप्रवाशाच्या रूपात आले आणि त्यांनी यजमानांंना विमानात चढण्यासाठी साहाय्य केले. त्यांनीच योग्य वेळी यजमानांना विमानतळाच्या व्यवस्थापकाच्या माध्यमातून रुग्णालयात भरती केले. प्रत्येक क्षणी जीवन आणि मृत्यू यांची झुंज चालू असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच सद़्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून नामजप करून यजमानांचे प्राण वाचवले अन् त्यांना नवीन जीवनाच्या रूपात आशीर्वाद दिला.
‘हे भगवंता, हे दयानिधी, हे प्रभो, या जन्मात मी असे काय केले की, ज्यायोगे मी तुझी अमर्याद कृपा अनुभवत आहे ! तुझ्या कृपेमुळेच आम्ही आमच्या तीव्र प्रारब्धावर मात करू शकलो. हे प्रभो, ‘आम्हाला अखंड गुरुध्यान, गुरुस्मरण आणि गुरुसेवा यांसाठी आशीर्वाद दे. हे भगवंता, मला तुझ्या कोमल चरणी समर्पित होता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’ (क्रमशः)
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१४.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |