उत्तराखंडमध्ये २६ अवैध मजारी बुलडोझरद्वारे हटवल्या !

(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांचे थडगे)

डेहराडून (उत्तराखंड) – येथील वन विभागाच्या परिसरात अवैधरित्या बांधलेल्या २६ मजारी उत्तराखंडमधील धामी सरकारने बुलडोझरद्वारे हटवल्या. उत्तराखंडमधील लँड जिहादच्या अंतर्गत जंगलांमध्ये १ सहस्र ४०० हून अधिक अवैध  मजारी आणि इतर अतिक्रमणे करण्यात आली होती. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही अवैध बांधकामे हटवण्याचे निर्देश दिले होते.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बरेलवी मुसलमान समाजाचे काही लोक ‘लँड मजार जिहाद’च्या अंतर्गत उत्तराखंडच्या जंगलात कार्यरत आहेत. हे लोक दगडांना चुना लावून जंगलांत दगडांचा ढिगारा बनवतात. त्यावर पांढरी आणि निळी चादर टाकतात आणि आजूबाजूच्या झाडांवर हिरवे झेंडे लावतात. त्यानंतर उदबत्ती पेटवून व्यवसाय चालू करतात. हळूहळू ही थडगी मोठे रूप धारण करतात. वनविभागाने जंगलात बांधलेले हजरत रोशन शाह यांचे कथित थडगे पाडले. आरक्षित वनक्षेत्रात अनेक अवैध मजारी बांधण्यात आल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. डेहराडून जिल्ह्यातील अवैध थडगी हटवण्याची वनविभागाची ही तिसरी मोठी मोहीम होती. दोन मासांपूर्वी डेहराडून वन विभागाने २४ मजारी हटवल्या होत्या.

संपादकीय भूमिका 

हे अतिक्रमण करणारे आणि ते होऊ देणारे यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !