जिवावर उदार होऊन विषारी साप पकडणारे आणि ‘पद्मश्री’ मिळवणारे वैदिवेल गोपाळ अन् मासी सदायन !

चित्रपटात एकाच वेळी अनेक शत्रूंशी मारामारी करणारे आणि अनेक कठीण गोष्टी सहजगत्या करणारे कलाकार सगळ्यांच्या तोंडी ‘हिरो’ (अभिनेते) म्हणून ओळखले जातात. अनेक प्रेक्षकांना त्यांच्या ‘खतरों के खिलाडी’ (धोका पत्करणारे खेळाडू) या प्रतिमेचे पुष्कळ आकर्षण असते; पण वास्तवात मात्र या कलाकारांचे व्यक्तीगत आयुष्य मात्र पुष्कळ वेगळे असते. असे असले, तरीही ते अनेकांसाठी हिरो असतात; पण प्रत्यक्षात धोका पत्करणारे व्यक्ती मात्र वास्तवात अगदी प्रतिदिन जिवावर उदार होऊन अनेक संकटांशी सामना करत असतात. अनेकदा ते आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या नजरेत कधी येतच नाहीत. या वर्षीच्या ‘पद्मश्री’ सन्मानाच्या सूचीत असाच धोका पत्करणार्‍या २ व्यक्तींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांच्या पराक्रमाचे सूप फक्त भारतातच नाही, तर साता समुद्रापार अमेरिकेत वाजले. त्यानंतर संपूर्ण जगात त्यांच्या नावाची चर्चा चालू झाली. हे सगळे घडल्यावर भारताने त्यांचा यावर्षीच्या ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरव केला आहे. ते ‘खतरों के खिलाडी’ आहेत तमिळनाडूचे ‘वैदिवेल गोपाल’ आणि ‘मासी सदायन’ !

डावीकडून वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन

१. वैदिवेल गोपाळ, मासी सदायन आणि इरुला आदिवासी समाज यांचे कार्य

वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन हे दोघेही इरुला या आदिवासी समाजाचे घटक आहेत. या समाजाचा साप आणि उंदीर पकडण्याशी ऐतिहासिक संबंध आहे. पिढ्यान् पिढ्या त्यांच्याकडे साप आणि उंदीर यांना कल्पकतेने पकडण्याचे ज्ञान हस्तांतरित होत आलेले आहे. हे ज्ञान केवळ त्यांना पकडण्याचे नाही, तर सापांचा विषारी दंश झाल्यावर त्या विषाची दाहकता न्यून करण्यासाठी ज्या जंगली वनऔषधींचा वापर होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो याविषयीही आहे. वर्ष १९७८ मध्ये इरुला ‘स्नेक कॅचर्स इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या स्थापनेमुळे हा समुदाय भारतातील विषविरोधी पद्धत प्रदान करणारी एकमेव अधिकृत संस्था बनला. त्यामुळेच सर्पदंशामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या भारतासारख्या देशात इरुला समुदायाचे कौशल्य आणि ज्ञान जीव वाचवण्यासाठी अमूल्य आहे.

२. विषारी साप आणि त्याचा दंश यांपासून लोकांना वाचवणारे वैदिवेल गोपाळ अन् मासी !

वैदिवेल गोपाळ आणि मासी यांनी लहानपणापासूनच साप पकडायला प्रारंभ केला. धोकादायक आणि विषारी साप पकडण्यात त्यांचे कौशल्य वाखण्यासारखे आहे. अनेक ठिकाणी विषारी साप पकडण्यासाठी त्यांना बोलावले जाऊ लागले. अशा परिस्थितीत ते ‘खतरों के खिलाडी’ची जोडी म्हणून प्रसिद्ध होऊ लागले आणि त्यांना अनेक राज्यांत बोलावले गेले. अनेक ठिकाणी विषारी साप पकडून त्यांनी अनेकांचे जीव वाचवले. कोणतेही अधिकृत शिक्षण नसतांना परंपरेने चालत आलेली साप पकडण्याची पद्धत अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती; पण त्याच पद्धतीने त्यांनी सापाच्या दंशापासून स्वतःचे संरक्षण करत अनेक विषारी सापांना पकडले होते.


”तमिळनाडूमधील दोन इरुला स्नेक कॅचर्सना भेटा ज्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे !”


३. फ्लोरिडा (अमेरिका) येथे वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन यांनी केलेली कामगिरी

साधारण २ वर्षांपूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात ‘बर्मी’ अजगरांनी धुमाकूळ घातला होता. अत्यंत धोकादायक असलेल्या या अजगरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून जवळपास ८०० साप पकडणार्‍या लोकांना फ्लोरिडामध्ये बोलावले गेले. त्यात वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन यांनाही निमंत्रण होते. वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन यांनी पुढल्या १० दिवसांत अत्यंत धोकादायक असलेल्या १४ अजगरांना पकडून अमेरिकेच्या अधिकार्‍यांच्या समोर स्वतःची प्रतिभा दर्शवली. या जोडीने त्या ८०० जणांमधून सर्वाधिक अजगर पकडले. त्यांच्या साप पकडण्याच्या तंत्रज्ञानाने प्रभावित झालेल्या अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी त्यांना तेथील लोकांना त्यांचे तंत्रज्ञान शिकवण्याची विनंती केली. अमेरिकेत त्यांच्या ज्ञानाचा डंका वाजल्यामुळे त्यांना जगातील इतर अनेक देशातून निमंत्रण आले. थायलंडमधून तेथील सर्पतज्ञांना शिकवण्यासाठी पाचारण करण्यात आले.

४. जगभर आदिवासी समाजासह देशाचे नाव उज्ज्वल करणारे वैदिवेल आणि मासी !

अमेरिका, थायलंड येथे स्वतःच्या प्रतिभेने सगळ्यांना प्रभावित केल्यावर ‘खतरों के खिलाडीं’च्या जोडीने अनेक देशातून साप पकडण्याच्या परंपरागत तंत्रज्ञानाला जगभरात तर पोचवले; पण त्या पलीकडे जगातील अनेक लोकांना अत्यंत विषारी साप पकडण्यास शिकवले. भारताच्या एका आदिवासी आणि समाजरचनेत सगळ्यात तळाशी असणार्‍या व्यवस्थेतून त्यांनी स्वतःचे कौशल्य जगात सर्वदूर पसरवले. त्यातून त्यांनी स्वतःसह त्यांच्या समाजाचे आणि त्या निमित्ताने भारताचे नाव या क्षेत्रात अतिशय वर नेले.

श्री. विनीत वर्तक

५. …गेल्या काही वर्षांपासून ‘पद्म’ सन्मानाची व्याख्या पालटते आहे !

त्यांच्या याच कार्याची नोंद घेतांना भारत शासनाने त्यांची या वर्षीच्या ‘पद्मश्री’ सन्मानासाठी निवड केली आहे. वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन यांचा ‘खतरों के खिलाडी’चा प्रवास नुसता त्यांच्या कौशल्यासाठी नाही, तर समाजरचनेत अन् भारतीय लोकशाहीत होणार्‍या पालटांसाठी अनेकांना स्फूर्ती देणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘पद्म’ सन्मानाची व्याख्या पालटते आहे. समाजातील सगळ्यात तळाशी असणारा व्यक्ती स्वकर्तृत्वाने ‘पद्म’ सन्मानाचा मानकरी ठरतो, तेव्हा तो सर्व प्रवास भारताची एक प्रतिमा निर्माण करतो, जी जगात देशाचे नाव उंचावर नेण्यासाठी एक मैलाचा दगड ठरते. तूर्तास ‘खतरों के खिलाडी’ वैदिवेल गोपाळ आणि मासी सदायन यांचे मनःपूर्वक अभिनंदन अन् पुष्कळ शुभेच्छा !

– श्री. विनीत वर्तक, अभियंता, मुंबई (३१.१.२०२३)

(श्री. विनीत वर्तक यांच्या ‘ब्लॉग’वरून साभार)