रत्नागिरी – शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्याच अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील शेतकर्यांना प्रगत तंत्रज्ञानाकडे वळवून फळपीक उत्पादनासमवेत प्रक्रिया उद्योगातून कोकणच्या अर्थकारणाला चालना मिळेल, अशी माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन, सरचिटणीस उमेश कुलकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर उपस्थित होते.
अवधूत वाघ पुढे म्हणाले,
१. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने राज्यात वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच शिवचरित्राची माहिती देणारी उद्याने राज्यभरात उभारली जातील. या एकूण उपक्रमासाठी ६५० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.
२. शेतकर्यांची कर्जमाफी, केंद्रशासनाच्या धर्तीवर शेतकर्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान, केवळ १ रुपयात शेतकरी विमा, वर्ष २०१७ च्या निकषाप्रमाणे शेतकर्यांचे सात-बारे कोरे या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
३. रासायनिक फवारणी आणि खते यांमुळे कर्करोगासारखे दुर्धर आजाराचे प्रमाण वाढले आहे.
४. भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
५. कोकणात आंबा, काजू, मासे हे प्रमुख व्यवसाय आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून येथील फळांवर प्रक्रिया करून निर्यातीद्वारे उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरकारने ३ सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. यातून कोकणात फळ प्रक्रिया उद्योग उभे रहातील.