चांगले किंवा वाईट आतंकवादी असा भेद करणे चुकीचे !

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची पाकवर टीका

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज

न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकवर टीका केली. ‘ग्लोबल काऊंटर-टेररिझम स्ट्रॅटेजी’च्या (जी.सी.टी.एस्.च्या) ८ व्या पुनरावलोकनाच्या  ठरावावर चर्चा करतांना संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांना आतंकवादाविषयी खुलेपणाचे भाष्य केले. आतंकवादी केवळ आतंकवादीच असतात. त्यामध्ये ‘चांगले किंवा वाईट आतंकवादी’ असे काही नसते. आतंकवादी घटनांमागील हेतूच्या आधारे आतंकवाद्यांमध्ये भेद करणे अत्यंत धोकादायक आहे. याचा परिणाम जागतिक स्तरावर आतंकवादाच्या विरोधात चालू असलेल्या माहिमेवर होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रुचिरा कंबोज पुढे म्हणाल्या की, सर्व प्रकारची आतंकवादी आक्रमणे, मग ती शीखविरोधी, बौद्धविरोधी किंवा हिंदुविरोधी असोत, निषेधार्ह आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने नवीन संज्ञा आणि चुकीचे प्राधान्यक्रम यांच्या विरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे. आतंकवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध केला पाहिजे. आतंकवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन होऊच शकत नाही. पाकिस्तानकडे बोट दाखवत कंबोज म्हणाल्या की, आतंकवाद्यांना आश्रय देणारे देश ओळखले पाहिजेत. त्यांना त्यांच्या कृतीसाठी उत्तरदायी धरले पाहिजे.