कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये राज्य कामगार विमा योजनेच्या ५० खाटांच्या रुग्णालयास संमती !

प्रतिकात्मक छायाचित्र

कुपवाड (जिल्हा सांगली) – कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये ‘कृष्णा व्हॅली चेंबर’च्या वतीने सलग ३ वर्षे ‘ई.एस्.आय.’चे (राज्य कामगार विमा योजना) रुग्णालय उभारणीसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर ‘महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी’, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक करंजकर यांनी मान्यता दिल्याने ५० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘कृष्णा व्हॅली चेंबर’च्या प्रयत्नाला यश मिळाले असल्याची माहिती ‘कृष्णा व्हॅली चेंबर’चे अध्यक्ष सतीश मालू, संचालक रमेश आरवाडे यांनी दिली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष जयपाल चिंचवाडे, गुंडू एरंडोले, हरिभाऊ गुरव, दीपक मर्दा, अमोल पाटील यांसह अन्य उपस्थित होते.

सतीश मालू पुढे म्हणाले, ‘‘कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये ‘कृष्णा व्हॅली चेंबर’च्या वतीने राज्य कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभे करण्यासाठी भूखंड मागणी मिळण्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राज्य कामगार विमा योजना यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींशीसुद्धा संपर्क साधण्यात आला. यात सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी तत्परतेने याविषयी लक्ष घालून शिफारस देवून त्यात त्यांनी स्वत: लक्ष घातले. परिणामी ही संमती तात्काळ मिळू शकली.’’