रशियाकडून विशेष विशेषाधिकार प्राप्त, रणनीतीचा सहकारी दर्जा प्राप्त करणारा एकमेव देश भारत !

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून भारताचे कौतुक !

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

नवी देहली – चीन आणि भारत यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत. भारताच्या संबंधांविषयी रशियाने त्याला विशेष विशेषाधिकार प्राप्त रणनीतीचा सहकारी असा दर्जा दिलेला आहे. हा अधिकृत दर्जा आहे. मला नाही वाटत की, आम्ही असा अधिकृत दर्जा अन्य कुणाला दिलेला आहे, अशा शब्दांत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताचे कौतुक केले. ते जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी भारतात आल्यावर पत्रकारांशी बोलत होते.

भारत, चीन आणि रशिया कोणत्याही देशाच्या विरोधात षड्यंत्र रचत नाहीत !

परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह पुढे म्हणाले की, आम्ही भारत आणि चीन या दोन्ही महान देशांचे मित्र आहोत. भारत, चीन आणि रशिया यांचा त्रिकोण बनवण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला आहे. याचा परिणाम म्हणजे ब्रिक्स परिषदेची स्थापना झालेली आहे. आम्ही तिघे जितके भेटू तितके आमचे संबंध अधिक चांगले होतील. आम्ही कधीही कोणत्याही देशाच्या विरोधात षड्यंत्र रचण्यात सहभागी होत नाही; मात्र दुर्दैवाने काही अन्य देश तथाकथित इंडो-पॅसिफिक रणनीतीच्या अंतर्गत क्वाडचा (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची संघटना) वापर करत आहेत. आज क्वाडचा वापर आर्थिक उद्देशासाठी केला जात नाही, तर सैनिकीकरणासाठी केला जात आहे. अमेरिकेच्या मित्रांकडून प्रसारित करण्यात येणारे विचार आशिया शिखर संमेलनाला नष्ट करण्याच्या उद्देशाचे आहेत. याचा अर्थ आहे की, आशियातील शिखर संमेलन चीन आणि रशिया यांना वगळून करण्यात आलेले आहे.

झेलेंस्की यांना प्रश्‍न का विचारत नाही ?

सर्गेई यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाविषयी सांगितले की, प्रत्येक जण विचारत आहे की, रशिया चर्चेसाठी सिद्ध आहे का ? पण झेलेंस्की यांना चर्चेसाठी कधी जात आहात ?, असा प्रश्‍न कुणीही विचारतांना दिसत नाही ? गेल्या वर्षी झेलेंस्की यांनी एका कागदावर स्वाक्षरी केली. यात लिहिले होते, जोपर्यंत पुतिन आहेत, तोपर्यंत रशियासमवेत चर्चा करणे गुन्हा आहे.