कचरा विल्हेवाटीसाठी गोवा सरकारकडून प्रतिवर्षी ५०० कोटी रुपये खर्च

गोवा सरकार अनेक वर्षे नापीक भूमीवर साठवलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून तिची विल्हेवाट लावणे आणि इतर कचर्‍याची विल्हेवाट लावणे यांसाठी प्रतिवर्षी ५०० कोटी रुपये खर्च करते

पणजी, २ मार्च (वार्ता.) – गोवा सरकार ‘लिगसी वेस्ट’वर (अनेक वर्षे नापीक भूमीवर साठवलेल्या कचर्‍यावर) प्रक्रिया करून तिची विल्हेवाट लावणे आणि इतर कचर्‍याची विल्हेवाट लावणे यांसाठी प्रतिवर्षी ५०० कोटी रुपये खर्च करते, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘लिगसी वेस्ट’ गेली ५० वर्षे टाकला जात आहे आणि त्यावर आतापर्यंत कुठल्याही सरकारने प्रक्रिया केलेली नाही. विद्यमान सरकार या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. लोकांनी प्लास्टिकचा वापर अल्प कसा करता येईल, हे पहावे आणि कमीतकमी कचरा कसा निर्माण होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आगामी अर्थसंकल्पात गोवा सरकार एक चांगला कचरा व्यवस्थापन प्रस्ताव घेऊन येणार आहे.’’