पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करा ! – पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल

पत्रकार परिषदेत पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल (डावीकडून तिसरे)आणि इतर मान्यवर

पणजी, २ मार्च (वार्ता.) – आगामी होळी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून साजरी करावी. रंगांचा वापर करतांना सरकारमान्य रंगांचाच वापर करावा, असे आवाहन पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे. ज्ञानप्रसारक मंडळाच्या आसगाव, बार्देश येथील महाविद्यालय आणि संशोधन केंद्राने गोवा सरकारचे पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् गोवा राज्य जैवविविधता मंडळ (गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड) यांनी आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग सिद्ध करून तो बाजारात उपलब्ध केला आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी वरील आवाहन केले. या पत्रकार परिषदेला गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. प्रदीप सरमुकादम, तसेच अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

 (सौजन्य : Prudent Media Goa)

पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांविषयी माहिती देतांना ज्ञानप्रसारक मंडळाच्या केंद्राचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग मुख्यत्वे मक्याच्या पिठापासून बनवला आहे. त्याचप्रमाणे रंग बनवण्यासाठी इतर नैसर्गिक घटकांचाही वापर करण्यात आला आहे. हा रंग कुणीही खाल्ला, तरी तो अपायकारक ठरणार नाही. एरव्ही होळीच्या रंगांमध्ये ‘मर्क्युरी’, ‘कॅडमियम्’, ‘कॉपर’ आदी जड धातू असतात आणि त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे रंग खडूच्या पुडीपासून बनवला जातो आणि ते बनवण्यासाठी काचेच्या कणांचाही वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग सिद्ध करण्यात आला आहे. नैसर्गिक रंग बनवण्यासाठी महाविद्यालयाचे शुल्क परवडू न शकणार्‍या कौशल्य विकास क्षेत्रातील एकूण ३० गरीब मुलांची निवड करण्यात आली आहे. या रंगांची विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक गट सिद्ध केला आहे. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत एकूण १ टन रंग बनवला आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनवण्यासाठी एकूण १०० स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पिवळा, निळा, हिरवा आणि नारिंगी, असे हे ४ रंग आहेत. हे रंग बनवण्यासाठी हळदीचा वापर करण्यात आल्याने या रंगांची विक्री वाढल्यास राज्यातील हळद लागवडही वाढून त्याचा स्थानिकांना लाभ होणार आहे. हे रंग वापरल्याने शरिराला कोणतीही हानी पोचत नाही. रंगांचे मूल्यही अल्प ठेवण्यात आले आहे.’’ या रंगांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ७०३८२४५५१९/९८९०२५९६४४/९४२२४१३८९९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.