भ्रमणभाषसंच मिळून निवृत्ती वेतन योजना लागू होणार !
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या राज्यशासनाकडून मान्य करण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात १ सहस्र ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, तसेच अंगणवाडी सेविकांना भ्रमणभाषसंच दिला जाईल आणि त्यांना निवृत्ती वेतन योजनेचा लाभही घेता येईल. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कार्यकर्ती आणि साहाय्यनीस यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला होता. त्यानंतर राज्यशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
अंगणवाडी सेविकांनी केलेल्या संपाचा फटका लाखो बालकांना बसत होता. अंगणवाडी बंद असल्याने ६ वर्षांपर्यंतची बालके पोषण आहारापासून वंचित रहात होती, समवेतच गर्भवती मातांची पडताळणी, लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही परिणाम होतांना पहायला मिळत होता. त्यानंतर राज्यशासनाने चर्चेची भूमिका घेतली आणि या मागण्या मान्य केल्या.
मान्य केलेल्या मागण्या !
अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी लागू करणे किंवा त्यांच्या मानधनात वाढ करणे, नवीन भ्रमणभाष संच उपलब्ध करून देणे, निवृत्ती वेतन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-साहाय्यनीस यांनी बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. या काळात राज्यातील अंगणवाड्या बंद करून सर्व अंगणवाडी सेविका आणि साहाय्यनीस संपात सहभागी झाल्या होत्या.