‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या स्‍फूर्तीगीताने महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळ अधिवेशनाला प्रारंभ !

महाराष्‍ट्र विधान भवन 

मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताला राज्‍यगीताचा दर्जा मिळाल्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाच्‍या दोन्‍ही सभागृहांत प्रथमच हे गीत वाजवण्‍यात आले. ‘वन्‍दे मातरम्’ आणि त्‍यानंतर ‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ या गीताने विधीमंडळाच्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. या गीतानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणा सभागृहात देण्‍यात आल्‍या. विधीमंडळाच्‍या अधिवेशनाच्‍या प्रारंभी आणि शेवटी हे गीत लावण्‍याचा शासन आदेश महाराष्‍ट्र शासनाने काढला आहे. या अधिवेशनापासून त्‍यावर कार्यवाही झाली आहे.

या वेळी छगन भुजबळ यांनी ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्‍त व्‍हावा’, हा विषय सभागृहात उपस्‍थित केला. त्‍या वेळी ठाकरे गटाचे आमदार भास्‍कर जाधव यांनी सभागृहात बोलण्‍यासाठी अनुमती मागितली; मात्र अध्‍यक्षांनी बोलण्‍याची अनुमती नाकारल्‍याने सभागृहात मोठमोठ्याने बोलण्‍यास प्रारंभ केला. या वेळी गृहमंत्री फडणवीस यांनी भास्‍कर जाधव अध्‍यक्षांना धमकावत असल्‍याच म्‍हटले. यावर अध्‍यक्ष नार्वेकर यांनी सर्वांनी अध्‍यक्षपदाचा आणि महाराष्‍ट्राच्‍या विधीमंडळाचा नावलौकिक टिकवून ठेवण्‍याचे आवाहन केले. विधानसभेच्‍या कामकाजाला प्रारंभ झाल्‍यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्‍यपालांच्‍या अभिभाषणाचा अभिनंदनाचा प्रस्‍ताव मांडला. आमदार संजय कुटे यांनी प्रस्‍तावाला अनुमोदन दिले. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी सभागृहात राज्‍यपालांच्‍या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. यानंतर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सर्व २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्‍या पुरवण्‍या मागण्‍या सादर केल्‍या. यानंतर योगेश सागर, संजय शिरसाट, संजय भुसारे आणि सुभाष गोटे यांची तालिका सभापती म्‍हणून नियुक्‍ती करण्‍यात आली. राज्‍यपालांनी संमत केलेल्‍या सुधारणा विधेयकांचे सभागृहात वाचन करण्‍यात आले. यानंतर आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार केशवराव धोंडगे, माजी आमदार डॉ. देवीसिंह शेखावत यांच्‍या निधनाविषयी शोक प्रस्‍ताव सभागृहात सादर करण्‍यात आला. त्‍यानंतर सभागृहाचे कामकाज स्‍थगित करण्‍यात आले.