स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाने हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे महत्कार्य केले ! – दिलीप गोखले, रा.स्व. संघ

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाचे शताब्दी वर्ष !

रत्नागिरी – आमचा देश नेमका कोणता ? तेथे रहाणारे हिंदू म्हणजे नेमके कोण ? हिंदु कोणाला म्हणावे ? याचे सुस्पष्ट विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात मांडले आहेत. त्यांच्या या ग्रंथामुळे हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिगं चेतवण्याचे महत्कार्य केले, असे उद्गार  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दिलीप गोखले यांनी येथे काढले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील ओम साई मित्र मंडळाच्या वतीने २५ फेब्रुवारीला सायंकाळी आयोजित केलेल्या व्याख्यानात श्री. गोखले बोलत होते. या वेळी व्यासपिठावर ओम साई मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे उपस्थित होते. रा.स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. प्रवीण जोशी यांनी हिंदु गीत म्हटले.

श्री. गोखले पुढे म्हणाले, ‘‘स्वा. सावरकरांनी हिंदुत्व ग्रंथात हिंदु शब्दाची व्याख्या सांगितली आहे. सिंधु नदीच्या उगमस्थानापासून सिंधु सागरापर्यंतची जी विस्तृत भूमी भारत, ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे, तो म्हणजे हिंदू. केवळ भारतात जन्म झाला अथवा त्याचे आई-वडील येथे रहातात म्हणून तो हिंदु होत नाही, तर भारत ही ज्याची पुण्यभूमी आहे, तो हिंदु. अर्थात् या देशातील सनातन हिंदु धर्म संस्कृती यांना जो मानतो, ज्यांच्या उपासना, देवता, श्रद्धास्थान यांचे उगमस्थान भारत आहे, तो म्हणजे हिंदु. या अर्थाने भारतातील आर्य, द्रविड, बौद्ध, जैन, शीख हे सगळे हिंदुच आहेत. बौद्ध, जैन, शीख, लिंगायत या पंथांचे निर्माते भारतातच जन्मले म्हणून ते हिंदुच आहेत, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेल्या या व्याख्येवरून स्पष्ट होते. वर्ष १९२१ मध्ये सावरकरांना अंदमानमधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या कारागृहात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी ‘हिंदुत्व’ आणि ‘माझी जन्मठेप’ हे ग्रंथ लिहिले. भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी स्वा. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारांच्या प्रेरणेतून सर्व हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.’’

या कार्यक्रमामध्ये हिंदु शब्दाची व्याख्या, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा म्हणण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सूत्रसंचालिका सौ. दीप्ती आगाशे यांनी म्हटलेल्या संपूर्ण वन्दे मातरम् गीताने झाली.

कार्यक्रमाला ओम साई मित्र मंडळाचे सर्वश्री प्रवीण मलुष्टे, गौरांग आगाशे, प्रशांत सावंत, अभिषेक मगदूम, साईराज मयेकर यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.