श्री महालक्ष्मीदेवीच्या तोंडवळ्यावरील भाव पूर्णपणे पालटले असून मूर्ती धोकादायक स्थितीत !  

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पुरातत्व विभागाकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया केल्याचे प्रकरण

कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पुरातत्व विभागाकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचे काम चालू आहे; मात्र ‘ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत आहे कि काय ?’, अशी शंका निर्माण झाली आहे. सध्या मूर्तीची स्थिती अत्यंत नाजूक असून श्री महालक्ष्मीदेवीच्या तोंडावळ्यावरील भाव पूर्णपणे पालटले आहेत. सध्या भाविकांना पितळी उंबर्‍याच्या बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत असल्याने नेमकी वस्तूस्थिती समोर येत नाही. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तींविषयी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भक्तांकडून होत आहे, असे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ने दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तात पुढे म्हटले आहे की,

१. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर यापूर्वीही पुरातत्व विभागाने वज्रलेप केला असून मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि तोंडवळा या ठिकाणी पालट झाल्याचे दिसून येत आहेत.

२. नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ऑगस्ट-सप्टेंबरच्या कालावधीत देवीच्या ओठांना झालेली दुखापत लपवण्यासाठी तातडीने १८ आणि १९ सप्टेंबरला एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया केली; मात्र त्यानंतर देवीच्या तोंडावळ्यावरील भाव पूर्ण पालटले आहेत. २६ जानेवारीला देवीच्या डाव्या कानाजवळील कपचा निघाला. त्यामुळे श्रीपूजकांनी हे सूत्र २७ जानेवारी २०२३ ला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

३. न्यायालयाने या संदर्भात १४ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी ठेवली; मात्र प्रशासन, देवस्थान समिती अथवा पुरातत्व विभाग यांच्याकडूनच या संदर्भात उत्तर दिले गेले नाही.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची नाजूक स्थिती !

सध्या श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती अत्यंत नाजूक स्थितीत असून देवीच्या पानपात्राचा जो हात आहे, त्या हाताची दोन बोटे पूर्णपणे झिजली आहेत, तर म्हाळंग घेतलेल्या उजव्या हाताच्या बोटांचीही पूर्ण झीज झाली आहे. देवीच्या पावलांवरील बोटे पूर्णपणे झिजली आहेत आणि देवीचे वाहन असणारे सिंहाची पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनाशी झाली आहे. सिंहाचा तोंडवळाही अस्पष्ट झाला आहे. देवीच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट झालेत.

देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, हे धर्मशास्त्रविसंगत आहे ! – शंकराचार्य विद्यानृसिंहभारती, कोल्हापूर

शंकराचार्य विद्यानृसिंहभारती

ज्या चुका आहेत म्हणजेच श्री महालक्ष्मीदेवीला कुठे काय झाले आहे, हे दिसू नये म्हणूनच देवस्थान व्यवस्थापन समितीने लांबून दर्शनाचा खेळ केलेला दिसून येतो. कोणत्याही मंदिरातील देवता ही नीट स्वरूपात असलीच पाहिजे. तिच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले पाहिजे. जर तिच्या अंगाचे व्यंग होत असेल, तर भाविक प्रसन्न होणारच नाही. ‘आपण कुणाचे दर्शन घेतो’, हे भक्तांना कळाले नाही, तर हे बरोबर नाही. इतक्या लांबून लोक दर्शनाला येतात, त्यांना जर असे विकृत स्वरूप दिसायला लागले, तर ते योग्य नाही.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता ! – प्रसन्ना मालेकर, मूर्ती अभ्यासक

याविषयी मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर म्हणाले, ‘‘श्री महालक्ष्मी मूर्ती संवर्धन आणि वज्रलेप यांविषयी अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत. वर्ष १९२० मध्ये मूर्तीच्या हातावर तांब्या पडला आणि मूर्ती दुखावली; पण तेव्हापासून तो हात तसाच जोडून ठेवला आहे. वर्ष २०१५ मध्ये मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. सध्या देवीच्या पाणपत्राचा जो हात आहे त्या हाताची दोन बोटे पूर्णपणे झिजली आहेत. पावलावरील बोटे पूर्णपणे झिजली आहेत. त्यामुळे मूर्तीविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.’’

हिंदु धर्मातील धर्माचार्य, संत, महंत यांच्याशी चर्चा करून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने योग्य तो निर्णय घ्यावा ! – भाविकांची मागणी  

देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करायची झाल्यास, ती धर्मशास्त्रसंमत असायला हवी. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे योग्य उपाययोजना न काढता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर वर्ष २०१५ मध्ये रासायनिक वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती. या वज्रलेपनाला देवीभक्तांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता, तरी विरोध डावलून ते करण्यात आले. नंतर जेमतेम २ वर्षांतच देवीच्या मूर्तीवरील रासायनिक लेप निघायला आरंभ झाला, मूर्तीवर पांढरे डाग पडायला लागले आणि मूर्तीची झीज होतच राहिली. ही प्रक्रिया करतांना मूर्तीच्या मूळ रूपातच पालट केले गेले. आता विविध घटनांद्वारे लेपन केल्यानंतरची श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची स्थिती समोर येत आहे. तरी आता अधिक काळ न घालवता हिंदु धर्मातील धर्माचार्य, संत, महंत यांच्याशी चर्चा करून यावर पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भाविकांनी मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! धर्मशास्त्रविसंगत कृती करून भाविकांना देवीतत्त्वापासून वंचित ठेवले जात असून हे थांबवायचे असेल, तर मंदिर भक्तांच्या कह्यात द्या !

नई मूर्ति की स्थापना करना ही उचित ! – प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे