पाश्चात्त्य देशांनी जी-२० चा वापर रशियाच्या विरोधात केला ! – रशियाचा आरोप


बहुतेक G20 राष्ट्रांनी युद्धासाठी रशियाचा निषेध केला

मॉस्को (रशिया) – बेंगळुरू येथे जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांची बैठक कोणतेही संयुक्त विधान प्रसारित न करता समाप्त झाली. कारण युक्रेनविषयी पाश्चात्य देशांचा रशियाच्या विरोधी सूर होता. या बैठकीचा वापर रशियाचा विरोध करण्यासाठी झाला, असा आरोप रशियाने केला आहे. या बैठकीत रशिया आणि चीन संयुक्त विधानावर सहमत नव्हते. त्यामुळे बैठकीनंतर भारताने अध्यक्ष या नात्याने बैठकीचा सारांश आणि परिणाम यांविषयीची माहिती प्रसारित केली होती.

१. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसारित केलेल्या निवेदनात या संदर्भात म्हटले आहे की, आम्हाला खेद आहे की, पाश्चात्त्य देशांकडून संघटितपणे जी-२० च्या उपक्रमांना अस्थिर केले जात आहे. याचा वापर रशियाच्या विरोधात करण्याच्या दृष्टीने केला जात आहे. आमचे विरोधक (अमेरिका, युरोप आणि जी७ देश) आम्हाला वेगळे पाडण्याचा, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेतील समस्यांना उत्तरदायी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. भारताविषयी यात म्हटले की, भारताने सर्व देशांचे हित आणि त्यावर निष्पक्ष विचार करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात समतोल दृष्टीकोन ठेवला होता. हा आर्थिक आणि संबंधित क्षेत्रांमधील अव्हानांना सामोरे जाण्यासाठी चांगला पाया आहे, अशा शब्दांत रशियाने भारताचे कौतुक केले.