रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध लवकर समाप्त व्हावे ! – पंतप्रधान मोदी

नवी देहली – भारताने नेहमीच रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद हा चर्चा आणि मुत्सद्दीपणा यांद्वारे सोडवण्यावर भर दिला आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेमध्ये योगदान देण्यास सिद्ध आहे. या दोन्ही देशांतील युद्ध लवकर समाप्त झाले पाहिजे, असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेमध्ये मांडले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि जर्मनी या दोन्ही मोठ्या लोकशाही अर्थव्यवस्थांमध्ये वाढते सहकार्य दोन्ही देशांच्या लोकांसाठी लाभदायक आहे. जर्मनी हा युरोपमधील भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. आम्ही संरक्षण आणि सुरक्षा या संदर्भातील संबंधांमध्ये विस्तार करण्याच्या दिशेने काम करत आहोत.

भारताने फार प्रगती केली ! – चान्सलर ओलाफ स्कोल्झ

चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी या वेळी म्हटले की, भारताने फारच प्रगती केली आहे आणि ती दोन्ही देशांच्या संबंधांसाठी चांगली आहे. रशियाच्या आक्रमकतेचा परिणाम जग भोगत आहे. अशा वेळी सर्व देश भोजन आणि ऊर्जा यांच्या पूर्ततेकडे लक्ष देत आहेत.