गडकोट जतन करून त्‍यांना पुनर्वैभव प्राप्‍त करून देणे, हेच आमचे एकमेव ध्‍येय आहे ! – रवींद्र पडवळ, समस्‍त हिंदु बांधव, संस्‍थापक अध्‍यक्ष

पुणे – राज्‍य पुरातत्‍व विभागाच्‍या किल्ले श्री राजगडावर चालू असणारा मनमानी कारभार, तसेच मुख्‍यमंत्र्यांनी स्‍वतः जनतेसमोर दिलेल्‍या गडकोटांच्‍या स्‍वतंत्र महामंडळ स्‍थापन करण्‍याच्‍या संदर्भात दिलेल्‍या आश्‍वासनपूर्तीची टाळाटाळ करणे या विरोधात समस्‍त हिंदु बांधव एकवटले आहेत. आपला ऐतिहासिक वारसा, हिंदवी स्‍वराज्‍य संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट जतन करण्‍यासाठी आणि त्‍यांचे वैभव पुन्‍हा मिळवणे हेच आमचे एकमेव ध्‍येय आहे, असे समस्‍त हिंदु बांधवचे संस्‍थापक अध्‍यक्ष रवींद्र पडवळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे.

रवींद्र पडवळ यांनी मांडलेली अन्‍य सूत्रे

१. किल्ले श्री राजगड म्‍हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्‍या राजधानीवर महाराष्‍ट्र राज्‍य पुरातत्‍व खाते पाली दरवाजाजवळील चौथर्‍यासमान अवशेषाचे दगड उचकटून काढत आहे आणि त्‍यावर फरशी लावून सुशोभीकरणाचे काम करणार आहे. जे गड शिवरायांच्‍या अस्‍तित्‍वाशी निगडित आहेत, त्‍यांचे संवर्धन करण्‍याऐवजी सुशोभीकरण का केले जात आहे आणि कुणासाठी..? १५ फेब्रुवारीला काढलेल्‍या पुरातत्‍व विभागाच्‍या पत्रकात राजगडावर रहाण्‍यास किंवा मुक्‍काम करण्‍यास बंदी घातली गेली आहे.

२. २८ सप्‍टेंबर २०२२ या दिवशी समस्‍त हिंदु बांधव सामाजिक संस्‍थेच्‍या वतीने आझाद मैदान येथे झालेल्‍या गडकोट महामंडळ स्‍थापनेच्‍या मोर्च्‍यास येऊन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘गडकोट महामंडळाची स्‍थापना लवकरात लवकर करू’, असे आश्‍वासन दिले होते; परंतु  सरकारकडून अजूनही कोणतेही पाऊल त्‍यासाठी उचलण्‍यात आले नाही. अनेक पाठपुराव्‍यानंतरही सरकार भूमिका स्‍पष्‍ट करत नाही. शालेय पुस्‍तकातून इतिहास गायब होण्‍याच्‍या मार्गावर आहे. तर गडकोट हे अतिक्रमण आणि सुशोभीकरणाच्‍या विळख्‍यात अडकत चालले आहेत. विशाळगड, पावनगड लोहगड अशा अनेक गडांच्‍या परिस्‍थितीवरून हे लक्षात येते.

संपादकीय भूमिका 

छत्रपती शिवरायांच्‍या गडकोटांचे रक्षण हे आत्‍मसन्‍मान आणि पर्यायाने आत्‍मरक्षण यांसाठी अत्‍यावश्‍यक !