श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्‍यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा श्री. धैवत वाघमारे आणि मुलगी श्रीमती धनश्री देशपांडे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. काल या लेखातील काही सूत्रे पाहिली. आज पुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/656166.html

श्रीमती मेघना वाघमारे

४. गुणवैशिष्‍ट्ये

४ उ. सात्त्विक गोष्‍टींची आवड : अल्‍प व्‍ययात; परंतु सात्त्विक वस्‍तू, सात्त्विक रंग, तसेच सात्त्विक नक्षीकाम असलेल्‍या गोष्‍टीच ती आणायची. तिच्‍या साड्यांचे रंग डोळ्‍यांना आल्‍हाददायक असायचे, तसेच त्‍यांच्‍यावरील नक्षी कधीच बटबटीत नसायची.

४ ऊ. मुलांवर सात्त्विकतेचे संस्‍कार करणे

१. तिने आमच्‍यावर सात्त्विकतेचेच संस्‍कार करण्‍याचा प्रयत्न केला. प्रतिदिन सकाळी उठल्‍यावर देवापुढे उभे राहून श्‍लोक आणि सायंकाळी शुभंकरोती अन् स्‍तोत्रांचे पठण करून घेत असे.

२. रात्री वीज गेल्‍यास आमच्‍या वाड्यातील सर्व लहान मुले एकत्र येऊन अंताक्षरी खेळायचे. त्‍या वेळी ‘चित्रपट गीतांवर खेळ खेळावा’, असे सर्वांना वाटायचे; परंतु तिने आम्‍हाला स्‍तोत्रांतील श्‍लोक, मराठी काव्‍यांतील पदे, उदा. केकावली, नलदमयंती आख्‍यान इत्‍यादींतील पदे घेऊन खेळण्‍याची सवय लावली. त्‍यामुळे आम्‍हाला बरीच स्‍तोत्रे आणि श्‍लोक पाठ झाले.

४ ए. देवाप्रतीचा भाव

श्रीमती धनश्री देशपांडे

१. तिला मासिक वेतन मिळाल्‍यानंतर घरी आल्‍यावर ते वेतन पाकिटात घालून ती देवापुढे ठेवायची. २४ घंट्यांनंतर ती ते वेतन वापरायला घ्‍यायची. ‘देवच माझा चरितार्थ चालवतो’, असा तिचा भाव नेहमी असायचा. त्‍यामुळे घरी कधी काही कमी पडले, असे झाले नाही. असे असूनही ती कधी वायफळ खर्च करत नसे.

२. साधनेत आल्‍यानंतर ती मासिक वेतन देवापुढे ठेवायची. त्‍यानंतर ८ – १० दिवस तिने ते देवापुढून उचललेलेच नसायचे. देवच चरितार्थ चालवत असल्‍याने आणि आई नोकरीव्‍यतिरिक्‍तचा सर्व वेळ साधनेसाठी देत असल्‍याने तिला कशाची भ्रांत नव्‍हती.

३. आम्‍ही महाविद्यालयात असतांना परीक्षाशुल्‍क भरायचे होते. त्‍या वेळी आईजवळ काहीच पैसे नव्‍हते. ‘देव काही तरी सोय करील’, या श्रद्धेने ती घरातील कामे करत होती. त्‍या दिवशी अचानक एका विद्यार्थ्‍याचे पालक तिच्‍याकडे आले आणि तिला म्‍हणाले, ‘‘काही वर्षांपूर्वी माझी आर्थिक परिस्‍थिती चांगली नसतांना तुम्‍ही माझ्‍या पाल्‍याकडून शुल्‍क घेतले नव्‍हते. आज माझी स्‍थिती चांगली आहे. त्‍यामुळे मी तेव्‍हाचे पैसे आज देण्‍यासाठी आलो आहे.’’ त्‍या पालकांनी आईला ५ सहस्र रुपये त्‍या वेळी दिले.

४ ऐ. तिने आयुष्‍यात फार कष्‍ट केले; परंतु तिने ते तिच्‍या वागण्‍या-बोलण्‍यातून कधीही जाणवू दिले नाहीत.

४ ओ. सहनशील : ती पुष्‍कळ सहनशील आहे. दोन वेळा तिच्‍या डोक्‍याला एकाच ठिकाणी मार लागून टाके पडले होते. त्‍या ठिकाणी पुष्‍कळ वेदना होत असूनही काही दिवसांतच ती परत नोकरीवर रुजू झाली. साधनेत आल्‍यावर कमरेच्‍या दुखण्‍यामुळे तिला विभागात सेवेसाठी जाता येत नव्‍हते. त्‍यामुळे ती वेदना सहन करून खोलीत बसून सेवा करायची. तिच्‍या कमरेचे शस्‍त्रकर्म होऊनही ती ८-१० घंटे संगणकावर सेवा करते.

४ औ. वेळ वाया न घालवणे : साधनेत येण्‍यापूर्वीही ती सतत काही ना काही करत असायची. ती वेळ घालवत बसली आहे, असे कधी व्‍हायचे नाही. साधनेत आल्‍यावरही वेळेचा अधिकाधिक वापर ती सेवेसाठीच करते.

५. साधनेत आल्‍यावरचे जीवन

श्री. धैवत वाघमारे

५ अ. साधनेसाठी वेळ देता यावा, यासाठी शिकवणी वर्ग घेणे बंद करणे; मात्र तशाही स्‍थितीत प्रपंचाला काही उणे न पडणे : साधनेत येईपर्यंत आई शाळेव्‍यतिरिक्‍तच्‍या वेळेत शिकवण्‍या घ्‍यायची. आई सकाळी ७ वाजता शाळेत गेली की संध्‍याकाळी ५.३० वाजता घरी यायची. लगेच ६ वाजता शिकवणी वर्ग असायचे. साधनेत आल्‍यावर संध्‍याकाळी सत्‍संग असल्‍याने सत्‍संगाला उपस्‍थित रहाता यावे आणि पुढे सेवेचे महत्त्व कळल्‍यावर प्रसार करता यावा, यासाठी तिने शिकवणीवर्ग घेणे बंद केले. त्‍यामुळे तेवढी मिळकत न्‍यून झाली. असे असतांनाही शाळेतून जेवढे वेतन मिळायचे तेवढ्यात घरखर्च भागायचा. तेव्‍हाही ७ – ८ दिवस आईला देवापुढे ठेवलेले वेतन उचलावे लागत नसे.

५ आ. प्रसारासाठी वाहन वापरूनही पेट्रोलसाठी अतिरिक्‍त खर्च न होणे : दैनंदिन प्रसारसेवा, सत्‍संग, ग्रंथ प्रदर्शने, प्रत्‍येक सप्‍ताहाला ‘साप्‍ताहिक सनातन प्रभात’चे ३६० वर्गणीदारांकडे जाऊन वितरण करणे इत्‍यादी सेवांसाठी आई दुचाकी वापरायची. त्‍यासाठी लागणारा इंधनाचा (पेट्रोलचा) खर्च अतिरिक्‍त होत नसे. २ गाड्या प्रसारासाठी वापरल्‍या जायच्‍या; पण तिला कधीही काहीही उणे पडले नाही.

५ इ. सेवेसाठी अवलंबून रहावे लागू नये; म्‍हणून वाहन चालवायला शिकणे : अध्‍यात्‍मप्रसाराची सेवा करण्‍यासाठी दूरपर्यंत जावे लागायचे. त्‍यासाठी ती दुचाकी वाहन चालवायला शिकली. ‘वाहनासाठी कुणावर अवलंबून रहावे लागू नये’, हा तिचा त्‍यामागचा उद्देश होता.

५ ई. पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी आरंभी संघर्ष होणे; मात्र पुढील वर्षभरात शाळेविषयीची ओढ जाणीवपूर्वक न्‍यून करून पूर्णवेळ साधना करू लागणे : वर्ष २००० मध्‍ये आईला पूर्णवेळ साधना करायची होती; मात्र एवढी वर्षे शाळेसाठी कष्‍ट करून तिने शाळा नावारूपाला आणली होती. त्‍यामुळे नोकरी सोडण्‍यासाठी तिचा पुष्‍कळ संघर्ष होत होता. त्‍या वर्षी ती नोकरी सोडू शकली नाही; परंतु तिने पुढील १ वर्षात जाणीवपूर्वक शाळेविषयीची ओढ न्‍यून केली आणि आनंदाने नोकरी सोडली. पूर्णवेळ साधना करण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर नातेवाइकांशी तिचे फारसे संबंध उरले नाहीत. त्‍यांच्‍याविषयीची आसक्‍ती तिने पूर्णपणे नाहीशी केली.

५ उ. स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या तीव्रतेची अनेकदा जाणीव करून दिल्‍यावर ते स्‍वीकारून दृढ निश्‍चयाने सेवा करत रहाणे : मानसिकदृष्‍ट्या ती पुष्‍कळ कणखर आहे. साधनेत येण्‍यापूर्वीच्‍या जीवनात तिने कधी कुणाकडे हात पसरले नाहीत. प्रत्‍येक प्रसंगावर ती खंबीरपणे मात करायची. साधनेत आल्‍यावर अनेकदा स्‍वभावदोष-निर्मूलन सत्‍संगांतून तिच्‍या चुका सांगण्‍यात आल्‍या आणि अहंची जाणीव करून देण्‍यात आली; मात्र ती कधी खचून गेली नाही.  साधनेचे महत्त्व कळल्‍यामुळे प्रत्‍येक परिस्‍थिती स्‍वीकारत तिने दृढ निश्‍चयाने सेवा करणे आणि स्‍वतःमध्‍ये पालट करण्‍याचे प्रयत्न चालू ठेवले.

६. कृतज्ञताभाव

‘लहानपणापासून कुलदेवता आणि श्री गुरु यांच्‍यामुळेच माझ्‍या जीवनात सुरक्षितता आहे. तेच माझा सगळा भार वहात आहेत. त्‍यांनी आजपर्यंत कधीही कशाची उणीव भासू दिली नाही. त्‍यामुळे कोणत्‍याही परिस्‍थितीत त्‍यांच्‍याच चरणी रहायचे’, असा कृतज्ञताभाव तिच्‍या मनात सतत असतो.

७. आईसंदर्भात एका तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणार्‍या साधिकेला आलेली अनुभूती

आई संगणकीय सेवा करते, तेव्‍हा ती नियमितपणे प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजप करत असते. रामनाथी आश्रमात ती ज्‍या ठिकाणी संगणकीय सेवा करते, त्‍या ठिकाणी तिच्‍या आसंदीत बसून एक तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणारी साधिका काही दिवस सेवा करत होती. तिथे बसून सेवा करतांना त्‍या साधिकेचा त्रास न्‍यून व्‍हायचा आणि तिला एकाग्रतेने सेवा करता यायची.’                                         (समाप्‍त)

– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे (मुलगी) आणि श्री. धैवत विलास वाघमारे (मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (६.१.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.