कर्णपूरण (कानांत तेल घालणे)

‘पूर्वीच्‍या काळी आपल्‍या घरातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍ती लहान मुलांच्‍या कानांमध्‍ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून ‘कर्णपूरण’ म्‍हणजे कानांत तेल घालण्‍याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले. असे होण्‍यामागील कारण म्‍हणजे काही लोक कानांत रात्री तेल घालून दुसर्‍या दिवशी त्‍याचा तेलकट किंवा ओशटपणा पूर्णतः स्‍वच्‍छ करत नाहीत. परिणामी कानांत बुरशीजन्‍य विकार होऊन त्‍यामुळे त्रास होतो आणि मग ‘कानांमध्‍ये तेल घालू नये’, असा समादेश (सल्ला) सरसकट दिला जातो. खरेतर कानांमध्‍ये तेल घातल्‍यानंतर दुसर्‍या दिवशी कान स्‍वच्‍छ करणे आवश्‍यक आहे.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

कानांमध्‍ये तेल का घालावे ?

१. कान हे वायूचे एक महत्त्वाचे स्‍थान आहे.

२. प्रवास करतांना कानांना थंड हवा लागल्‍यास वाताचे विविध विकार होतात. तेव्‍हा कान झाकावे लागतात. कान झाकून ठेवल्‍यास बरे वाटते.

३. सर्दी आणि अन्‍य वात विकारांपासून रक्षण होण्‍यासाठी वातावरील परमौषध म्‍हणजे तेल हे वातस्‍थानी म्‍हणजे कानांमध्‍ये घालणे अत्‍यंत उपयुक्‍त ठरते.

४. आवश्‍यक ती काळजी घेऊन योग्‍य प्रकारे कानांत तेल घातल्‍याने केवळ श्रवणेंद्रियांनाच नव्‍हे, तर अन्‍य इंद्रिये आणि वातस्‍थाने, तसेच मेंदू या सर्वांना सुखदायक अन् बलदायक ठरते.

५. कानांमध्‍ये तेल घालतांना ते कोमट करून घालावे आणि शक्‍यतो दिवसा घालावे. कानांत रात्री तेल घालणे टाळावे.

६. ज्‍यांच्‍या कानांच्‍या पडद्याला छिद्र आहे किंवा जंतूसंसर्ग झाला आहे, त्‍यांनी कानांत तेल घालू नये. अशांनी वैद्यांचे मार्गदर्शन घ्‍यावे.

७. चक्‍कर येणे, हे अनेकदा कानाशी संबंधित असते. कानामध्‍ये एक प्रकारचे द्रव असते. त्‍याची द्रवता किंवा घनता यांमध्‍ये काही पालट झाल्‍यास चक्‍कर येते. अशा प्रकारे येणारी चक्‍कर कर्णपूरण केल्‍याने आश्‍चर्यकारकरित्‍या थांबते.

सौजन्य विश्ववेद 

आयुर्वेदाच्‍या दिनचर्येमध्‍ये वर्णन केलेले; पण सध्‍या दुर्लक्षित असलेले कर्णपूरण हे विधीपूर्वक करून सर्वांना आरोग्‍यप्राप्‍ती व्‍हावी, हीच सदिच्‍छा !

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (२०.१.२०२३)

(संपर्कासाठी ई-मेल : [email protected])