घराच्‍या परिसरात असलेली झाडे, पक्षी अन् प्राणी यांच्‍याशी प्रेमाने संवाद साधून त्‍यांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !

घराच्‍या परिसरात असलेली झाडे आणि घराजवळून जाणारे पक्षी अन् प्राणी यांच्‍याशी प्रेमाने संवाद साधून त्‍यांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) !

पू. वामन राजंदेकर

१. घराच्‍या परिसरात मोठ्या आवाजात ओरडणार्‍या धनेश पक्षाला नारायणाचा नामजप करायला सांगून शांत रहायला सांगणारे पू. वामन राजंदेकर !

१ अ. पू. वामन यांनी मोठ्या आवाजात ओरडणार्‍या धनेश पक्षाची प्रेमाने विचारपूस करणे आणि त्‍यांना नारायणांचे स्‍मरण करायला सांगणे : ‘आमच्‍या घराच्‍या सभोवताली पुष्‍कळ मोठी (आंबा, फणस, काजू, सागवान यांची) झाडे आहेत. त्‍या झाडांवर अनेक पक्षी येऊन बसतात. ३०.१२.२०२२ या दिवशी घराच्‍या बाजूला असलेल्‍या आंब्‍याच्‍या झाडावर एक पक्षी बसला होता. तो मोठ्या आवाजात ओरडत होता. आम्‍ही प्रथमच पक्षाचा असा मोठा आवाज ऐकत होतो; म्‍हणून मी आणि पू. वामन ‘कोणता पक्षी आहे’, हे बघण्‍यासाठी घराच्‍या आगाशीत गेलो. त्‍या वेळी आंब्‍याच्‍या झाडावर धनेश (Hornbill हॉर्नबिल) नावाचा मोठा पक्षी बसलेला होता.  त्‍या पक्षाकडे बघून पू. वामन म्‍हणाले, ‘‘अरे, हा पक्षी का ओरडत आहे ? याला काय झाले ?’’ नंतर पू. वामन यांनी त्‍याच्‍याकडे बघत त्‍याला विचारले, ‘धनेश पक्षा, तुला काय झाले ? तू असा मोठ्याने का ओरडत आहेस ? तुला इथे काही दिसत आहे का ? तुला अनिष्‍ट शक्‍ती त्रास देत आहेत का ? तू नारायणांचे स्‍मरण कर. नारायण तुझ्‍या समवेत आहेत. तू काळजी करू नकोस.’

सौ. मानसी राजंदेकर

१ आ. पू. वामन यांचे बोलणे ऐकून धनेश पक्षी शांत होणे आणि त्‍याने उडून जाणे : पू. वामन यांचे बोलणे ऐकून धनेश पक्षी एकदम शांत झाला. तेव्‍हा ‘त्‍याला पू. वामन यांचे बोलणे समजले आहे आणि त्‍याला पू. वामन यांचे अस्‍तित्‍व जाणवले आहे’, असे मला वाटले. पू. वामन यांचे बोलणे संपल्‍यावर धनेश पक्षी उडून गेला.

१ इ. पू. वामन यांनी धनेश पक्षाला ‘तू असेच नारायणाचे स्‍मरण करत जा’, असे सांगणे : दुसर्‍या दिवशी सकाळी पू. वामन यांनी धनेश पक्षाला बघितले आणि ते म्‍हणाले, ‘काल तू किती छान केलेस. तू असेच नारायणाचे स्‍मरण करत जा. तू मोठ्याने ओरडू नकोस. तुझ्‍या समवेत नारायण आहेत.’ पू. वामन असे म्‍हणून हसले.

१ ई. धनेश पक्षी आल्‍याचे समजल्‍यावर पू. वामन यांना पुष्‍कळ आनंद होणे : त्‍या दिवसापासून धनेश पक्षी घराच्‍या परिसरातील झाडांवर येऊन बसतो. तो अधून मधून आवाज करतो; परंतु मोठ्याने ओरडत नाही. त्‍याने एकदा आवाज केला, तरी पू. वामन यांना तो आल्‍याचे समजते. तेव्‍हा त्‍यांना पुष्‍कळ आनंद होतो.

२. पू. वामन यांनी बाहेर फिरणार्‍या भटक्‍या कुत्र्यांना ‘शांत बसा, ओरडू नका आणि नीट रहा’, असे सांगणे

आमच्‍या घराजवळच्‍या मार्गावरून भटकी कुत्री फिरत असतात. त्‍यांना बघून पू. वामन म्‍हणतात, ‘‘हे आपल्‍या रक्षणासाठी इथे फिरत आहेत. त्‍यांना देवबाप्‍पाने पाठवले आहे.’’ पू. वामन मार्गाने जाता-येता त्‍या कुत्र्यांना सांगतात, ‘शांत बसा. ओरडू नका आणि नीट रहा.’

३. पू. वामन अंगणातील झाडांशी संवाद साधत असणे आणि ‘ती झाडे आनंदी आहेत’, असे जाणवणे

३ अ. पू. वामन यांनी झाडांशी पुष्‍कळ प्रेमाने बोलणे आणि ‘झाडे त्‍यांचे बोलणे ऐकून आनंदात आहेत’, असे  जाणवणे : पू. वामन प्रतिदिन अंगणातील झाडांना पाणी घालतात. तेव्‍हा ते सर्व झाडांशी पुष्‍कळ प्रेमाने बोलतात. त्‍या वेळी ‘त्‍यांचे बोलणे ऐकून सर्व झाडे पुष्‍कळ आनंदात आहेत’, असे मला जाणवते. पाणी घालतांना ते प्रत्‍येक झाडाला प्रेमाने सांगतात, ‘सर्वांनी पोटभर पाणी प्‍या. तुम्‍हाला तहान लागली असेल ना ?’

३ आ. सागवानाच्‍या झाडांना ‘अंगणात पानांचा पसारा करू नका’, असे प्रेमाने सांगणे : घराच्‍या मागच्‍या अंगणात सागवानाची दोन मोठी झाडे आहेत. त्‍या झाडांची सुकलेली पाने वार्‍याने खाली पडतात. त्‍यामुळे अंगणात पुष्‍कळ पाने पडलेली असतात. तो पानांचा खच बघून पू. वामन त्‍या सागवानाच्‍या झाडांना म्‍हणाले, ‘अरे, तुम्‍ही असा पानांचा पसारा करू नका रे, ते चांगले नसते. तुम्‍ही असा पसारा केलात, तर मी तुम्‍हाला रागवीन. आता तुम्‍ही पाणी पिऊन घ्‍या.’

३ इ. पू. वामन यांनी सांगितल्‍यानंतर प्रतिदिन पडणार्‍या झाडांच्‍या पानांचे प्रमाण उणावणे आणि ‘त्‍या झाडांतील सजीवपणा अधिकच वाढला आहे’, असे जाणवणे : पुढील २ दिवसांत सागवानाच्‍या झाडांची पाने खाली पडण्‍याचे प्रमाण न्‍यून झाले. हे बघून मी पू. वामन यांना म्‍हणाले, ‘‘सागवानाच्‍या झाडांनी तुमचे बोलणे ऐकले आहे. त्‍यामुळे पानांचा पसारा न्‍यून झाला आहे.’’ त्‍यावर पू. वामन म्‍हणाले, ‘‘हो ना, किती छान केले ना त्‍यांनी !’’ नंतर आम्‍ही पू. वामन यांना सांगितले, ‘‘झाडांची सुकलेली पाने खाली पडतातच. हे देवबाप्‍पानेच ठरवून दिलेले असते.’’ त्‍यावर पू. वामन म्‍हणाले, ‘‘हो बरोबर आहे; पण थोडाच पसारा करा’, असे देवबाप्‍पानीच (त्‍यांना) सांगितले आहे’’ आणि ते हसले. आता प्रतिदिन पडणार्‍या झाडांच्‍या पानांचे प्रमाण उणावले आहे. ‘ही सर्व झाडे आनंदी आहेत आणि त्‍यांच्‍यातील सजीवपणा अधिकच वाढला आहे’, असे मला जाणवते.

४. पू. वामन यांना प्रत्‍येक गोष्‍टीतच चैतन्‍य आणि सजीवता जाणवणे अन् त्‍यांना व्‍यक्‍ती, पशू-पक्षी, झाडे किंवा कोणतीही वस्‍तू यांच्‍याविषयी प्रेम वाटणे

‘पू. वामन यांना प्रत्‍येक गोष्‍टीतच चैतन्‍य आणि सजीवता जाणवते’, असे मला वाटते. ते सांगत असल्‍याप्रमाणे ‘सगळीकडे नारायण असतात’, याची मला अनुभूती येते. ते व्‍यक्‍ती, पशू-पक्षी, झाडे, पाने, फुले किंवा कोणतीही वस्‍तू यांच्‍याशी बोलू शकतात किंवा संवाद साधतात. त्‍यांना सर्वांविषयी प्रेम वाटते.

५. थंडगार वार्‍याची झुळूक आल्‍यावर पू. वामन यांनी ‘नारायणांनी फुंकर घातली; म्‍हणून थंड वारा आला’, असे सांगणे

एकदा आम्‍ही आगाशीत बसलो होतो. त्‍या वेळी पुष्‍कळ वेळाने थंड वार्‍याची झुळूक आली. ती झुळूक आम्‍हाला पुष्‍कळ चांगली वाटली. त्‍या वेळी मी पू. वामन यांना म्‍हणाले, ‘‘वायुदेवांनी आपल्‍याला किती थंड वारा दिला.’’ त्‍यावर पू. वामन म्‍हणाले, ‘‘नारायणांनी फुंकर घातली ना; म्‍हणून हा वारा आला. नारायणांमध्‍ये वायुदेव असतात; म्‍हणून नारायणांनी फुंकर घातली की, आपल्‍याला वारा लागतो.’’ त्‍यांचे हे उत्तर ऐकून मी आश्‍चर्याने त्‍यांच्‍याकडे बघत राहिले.

पू. वामन यांच्‍यामुळेच मला ‘प.पू. गुरुदेवच सर्वशक्‍तीमान आणि साक्षात् नारायण आहेत’, अशी अनुभूती क्षणोक्षणी अनुभवायला येते, त्‍याबद्दल प.पू. गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मानसी राजंदेकर (वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ३९ वर्षे), फोंडा, गोवा. (८.१.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक