जिहादी आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बशीर अहमद पाकमध्ये ठार !

आतंकवादी बशीर अहमद पीर

काबुल (अफगाणिस्तान) – हिजबुल मुजाहिद्दीन या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बशीर अहमद पीर याला पाकिस्तानातील रावळपिंडी येथे एका दुकानाबाहेर उभा असतांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केले. आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असल्यामुळे त्याला गेल्या वर्षी ४ ऑक्टोबरला आतंकवादी घोषित करण्यात आले होते. बशीर याचा जम्मू-काश्मीरमध्ये अनेक आतंकवादी आक्रमणांत हात होता. हाजी, पीर आणि इम्तियाज या सांकेतिक नावाने तो जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत असे. बशीर गेल्या काही वर्षांपासून रावळपिंडीत रहात होता. पाकिस्तान सरकारने त्याला देशाचे नागरिकत्व दिले होते.

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना घुसवण्याचे काम पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.ने बशीरवर सोपवले होते. जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्या माजी आतंकवाद्यांना पुन्हा सक्रीय करण्यात त्याचा हात होता. तो सतत इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना काश्मीरविरोधात चिथावणी देत होता.