महान भारताचा गौरव विद्यार्थ्यांच्या हातात आहे ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

कोल्हापूर येथे ‘दि न्यू एज्युकेशन सोसायटी’च्या शताब्दी महोत्सवाचा समारोप समारंभ

कोल्हापूर, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हा देश सुरक्षित आहे. लोहिया हायस्कूल संस्थेतील विविध विद्यार्थी देशभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांनो, ‘घरातून बाहेर जातांना आई-वडिलांच्या पाया पडूनच बाहेर पडणार’, ‘वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही’, ‘ताटात अन्न टाकून देणार नाही’, असे लहान लहान संकल्प करा. हे संकल्प पूर्ण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केल्यास यश निश्चितपणे मिळणार आहे. महान भारताचा गौरव तुमच्या हातात आहे. त्यामुळे शालेय जीवनातच ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. ध्येयाची पूर्तता करतांना अडचणींचा सामना करत त्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विद्यार्थ्यांना केले. ते ‘दि न्यू एज्युकेशन सोसायटी’चा शताब्दी महोत्सव समारोप समारंभ आणि ‘शतसंवत्सरी स्मरणिका’ प्रकाशन समारंभ कार्यक्रमात बोलत होते.

या वेळी अमित शहा यांच्या धर्मपत्नी सौ. सोनल शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, विनोदकुमार लोहिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवर वक्त्यांच्या हस्ते ‘शतसंवत्सरी स्मरणिका’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन देशाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली.

श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सौ. सोनल शहा