साधकांनी मंदिरातील स्वच्छता, पूजा आणि आरती भावपूर्ण केल्याने चैतन्य अन् पावित्र्य जाणवणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेले पुरातन शिवमंदिर !

१. देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या मागच्या बाजूला असलेले पुरातन शिवमंदिर गावातील अनेक जणांचे श्रद्धास्थान असणे

‘देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या मागच्या बाजूला एक पुरातन शिवाचे मंदिर आहे. या शिवमंदिरात प्रत्येक सोमवारी बाजूच्या गावातील भाविक येतात. हे मंदिर गावातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांना मंदिरात आल्यावर पुष्कळ अनुभूती येतात. त्यामुळे पुष्कळ भाविक नित्यनेमाने मंदिरात दर्शनाला येत असतात. ‘या शिवमंदिरात बोललेले नवस पूर्ण होतात’, अशी पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे.

श्री. शंकर नरुटे

२. मंदिरात चैतन्य अधिक प्रमाणात जाणवण्याची कारणे

२ अ. सनातनचे साधक मंदिराची सकाळ-संध्याकाळ स्वच्छता आणि नित्यनेमाने शिवाची पूजा अन् आरती करत असल्यामुळे शिवमंदिरात चैतन्य निर्माण होणे : आश्रमातील साधक या मंदिराची सकाळ-संध्याकाळी स्वच्छता करतात. ते नित्यनेमाने मंदिरातील शिवाची पूजा आणि आरती करतात. त्यामुळे या शिवमंदिरात चैतन्य निर्माण झाले आहे आणि येथील पावित्र्य अधिक प्रमाणात टिकून राहिले आहे. या चैतन्याचा लाभ आश्रमातील साधना करणार्‍या जिवांना आध्यात्मिक स्तरावर होतो. ‘साधकांनी श्रद्धेने आणि तळमळीने केलेली सेवा शिवचरणी रुजू झाली आहे’, असे मला वाटते. त्यामुळे ‘साधकांवर शिवदेवताही प्रसन्न आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे देवद आश्रमात शिवलोकाप्रमाणे शांती अनुभवायला येते.

२ आ. मंदिर पुरातन असल्यामुळे आणि या मंदिरात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ येऊन गेल्यामुळे ‘येथील परिसरातही चैतन्य आहे’, असे जाणवणे : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या शिवमंदिरात आल्या होत्या. त्यांनी साधकांना ‘मंदिराची देखभाल कशी करायची ? पूजा आणि आरती नेमाने कशी करायची ?’, याविषयी मार्गदर्शन केले. साधक मंदिराची स्वच्छता आणि शिवाची पूजा भावपूर्ण अन् परिपूर्ण करतात. त्याचा साधकांना साधनेच्या दृष्टीने अधिक लाभ झाला. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा संकल्प अधिक प्रमाणात कार्यरत आहे’, असे मला जाणवले. हे मंदिर पुरातन असल्यामुळे येथे अधिक चैतन्य आहे, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या मंदिरात येऊन गेल्यामुळे तेथील परिसरातही चैतन्य साकारल्याचे जाणवते.

२ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी शिवाला प्रार्थना करून आवाहन केल्यामुळे साधकांना स्थुलातून आणि सूक्ष्मातून शिवतत्त्वाचा लाभ होणे : ‘साधकांची साधनावृद्धी व्हावी आणि त्यांना आशीर्वादरूपी चैतन्य मिळावे’, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी शिवाला प्रार्थना करून आवाहन केले. त्यामुळे साधकांना स्थुलातून आणि सूक्ष्मातून शिवतत्त्वाचा लाभ होत आहे. साधकांना याची प्रचीती येत आहे. तेव्हा ‘भगवान शिवालाही साधकांसाठी शिवलोकातून या मंदिरात यावे लागले’, असे मला वाटले.

३. अनुभूती

अ. या मंदिरात पुष्कळ थंडावा जाणवतो.

आ. गाभार्‍यात बसल्यावर मन निर्विचार होते.

इ. या शिवमंदिरात आल्यावर भाविकांना एक प्रकारची शांती अनुभवायला येते.

ई. ‘मंदिरातून बाहेर येऊ नये’, असे भाविकांना वाटते.

भगवान शिव, शिवस्वरूप गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी आम्ही साधक कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१९.१.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक