संगीत आणि नृत्‍य यांच्‍या माध्‍यमातून साधना करतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना भगवान शिवाशी संबंधित आलेल्‍या अनुभूती !

साधना म्‍हणून  संगीत आणि नृत्‍य यांचा सराव करतांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधकांना शिवाशी संबंधित आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. संगीत विषयक अनुभूती

१ अ. कु. तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), संगीत विशारद, संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. तेजल पात्रीकर

१ अ १. गाणे आणि नृत्‍य यांच्‍या माध्‍यमातून भावावस्‍था अन् आनंदावस्‍था अनुभवणे : ‘मे २०१५ मध्‍ये एक दिवस सायंकाळी मी रामनाथी आश्रमातील राहत्‍या खोलीची स्‍वच्‍छता करत होते. स्‍वच्‍छता करून झाल्‍यावर सायं. ७.३० वाजण्‍याच्‍या सुमारास अकस्‍मात् मी नृत्‍यामध्‍ये शिकवलेले शिवाचे गाणे गुणगुणायला लागले. त्‍यावर स्‍थुलातून नृत्‍यही करायला लागले. (लहानपणी मी कथ्‍थक आणि भरतनाट्यम् या नृत्‍यप्रकारांच्‍या २ – २ परीक्षा दिल्‍या आहेत.) तेव्‍हा माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रूंच्‍या धारा वहात होत्‍या. मी गाणे आणि नृत्‍य यांच्‍याशी पूर्णपणे एकरूप झाले होते. मला माझे स्‍वतःचे अस्‍तित्‍वच जाणवत नव्‍हते. नृत्‍य करतांना ‘प्रभुद्वार चली, प्रभु की दासी । एक आस लिए, एक प्‍यास लिए ।’, हे गीत गात मी पार्वती बनून शिवाला आळवत होते. बर्‍याच वेळाने नृत्‍यातील गिरक्‍या घेऊन मी पलंगावर पडले आणि हमसाहमशी रडायला लागले. त्‍या भावावस्‍थेत काही वेळ गेल्‍यावर अश्रू थांबून मला पुष्‍कळ शांत वाटू लागले. त्‍या वेळी मी गाणे आणि नृत्‍य यांतील एक वेगळीच भावावस्‍था अनुभवली.

ही अनुभूती मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘तू संगीत साधनेतील भावावस्‍था आणि आनंदावस्‍था अनुभवलीस.’’

१ अ २. शिवपिंडीवर नामजपाच्‍या अभिषेकाचा भावप्रयोग करतांना आलेल्‍या अनुभूती आणि त्‍यांचा जाणवलेला अर्थ

१ अ २ अ. शिवपिंडीवर नामजपाचा अभिषेक करण्‍याचा भावप्रयोग करतांना ‘सप्‍त स्‍वरांची ही पुष्‍पे आपल्‍या चरणी अर्पण करवून घ्‍यावीत’, अशी शिवाला आर्तभावाने प्रार्थना केल्‍यावर शिवाने ते सप्‍त स्‍वर स्‍वीकारले’, असे जाणवणे : ८.१.२०१७ या दिवशी झालेल्‍या भावसत्‍संगात शिवपिंडीवर नामजपाचा अभिषेक करण्‍याचा एक भावप्रयोग करायला सांगितला होता. हा प्रयोग करण्‍यासाठी मी डोळे मिटल्‍यावर मला दिसले, ‘सूक्ष्मातून मी हातात ७ स्‍वररूपी पुष्‍पे घेऊन कैलास पर्वतावर गेेले आहे. तिथे भगवान शिव ध्‍यानस्‍थ बसला आहे. त्‍याला मी आर्तभावाने प्रार्थना केली, ‘ही पुष्‍पे आपल्‍या चरणी अर्पण करून घ्‍यावीत. त्‍याच भावस्‍थितीत मी नृत्‍यही करू लागले.’ अकस्‍मात् माझ्‍या कानांवर शब्‍द आले, ‘आता कृतज्ञता व्‍यक्‍त करूया.’ तेव्‍हा नृत्‍य थांबवून मी ती सप्‍त स्‍वरांची आेंजळ भगवान शिवाच्‍या चरणी अर्पण केली. तेव्‍हा शिवाने ध्‍यानातून जागृतावस्‍थेत येऊन माझे सप्‍त स्‍वर स्‍वीकारले’, असे मला जाणवले. ती अत्‍यंत भावविभोर अवस्‍था होती ! ते सप्‍त स्‍वर आणि नृत्‍य यांत माझे अस्‍तित्‍वच नव्‍हते.

१ अ ३. त्‍याच वेळी माझ्‍या कानांमध्‍ये अकस्‍मात् मुरलीचे सुमधुर स्‍वर ऐकायला येऊ लागले. तेव्‍हा मी एका वेगळ्‍याच भावस्‍थितीत होते.

१ अ ४. अनुभूतींचा जाणवलेला अर्थ

अ. या अनुभूतींचा विचार केल्‍यावर माझ्‍या लक्षात आले, ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी संगीताच्‍या माध्‍यमातून साधना करायला सांगितली आहे. शिव ही संगीताची देवता आहे. त्‍यामुळे शिवाला स्‍वरांनीच आळवले गेले.’

आ. नंतर माझ्‍या मनात विचार आला, ‘मी शिवाला नृत्‍याऐवजी गाऊन का नाही आळवले ?’ तेव्‍हा देवाने उत्तर दिले, ‘संगीतामध्‍ये गायन, वादन आणि नृत्‍य या तिन्‍हींचा समावेेश आहे. त्‍यामुळे या तीनही गोष्‍टी एकत्रित करून संगीताच्‍या माध्‍यमातून शिवाला आळवले गेले.’

इ. त्‍यानंतर माझ्‍या मनात आणखी एक प्रश्‍न आला, ‘शिवाविषयी अनुभूती येत असतांना शेवटी मला कृष्‍णाच्‍या बासरीचे स्‍वर का ऐकू आले ?’ तेव्‍हा देवाने सांगितले, ‘बासरीचा नाद हा अनाहत नाद आहे. संगीत साधनेच्‍या माध्‍यमातून आकाशतत्त्वाची, म्‍हणजे अनाहत नादाचीच अनुभूती घ्‍यायची असते.’

शिवाच्‍या कृपेमुळे मला ती अनुभूती घेता आली.

१ अ ५. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी सांगितलेल्‍या वाक्‍याचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे : साधारण जून २०१६ मध्‍ये संगीत या विषयावर बोलतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले मला म्‍हणाले होते, ‘‘आतापर्यंत कृष्‍णाच्‍या विविध अनुभूती आल्‍या. आता संगीतातून त्‍याच्‍या बासरीचे सूरही ऐकायचे आहेत !’’ त्‍यांच्‍या या वाक्‍याची मला प्रकर्षाने आठवण होऊन माझी भावजागृती झाली.

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान शिव यांच्‍या कृपेमुळेच मला ही अनुभूती आली’, यासाठी त्‍यांच्‍या चरणी अनन्‍यभावे कृतज्ञता !’

१ आ. कु. रेणुका कुलकर्णी, संगीत अभ्‍यासक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. रेणुका कुलकर्णी

१ आ १. संगीताच्‍या सेवेला आरंभ करण्‍यापूर्वी मानसरित्‍या कैलास पर्वतावर जाऊन केलेली शिवपूजा !

१ आ १ अ. भगवान शिवाला प्रार्थना करून सप्‍तसुरांचे आलाप घ्‍यायला आरंभ केल्‍यावर शिवाने नेत्र उघडून साधिकांकडे पाहून स्‍मित करणे : ‘मी संगीताशी संबंधित सेवा चालू करण्‍यापूर्वी मानसपूजा करते. तेव्‍हा संगीताशी संबंधित सेवा करणार्‍या सर्व साधकांना मी मानसरित्‍या कैलास पर्वतावर घेऊन जाते. तिथे गेल्‍यावर आम्‍ही सर्व साधक शिवाला ‘तुझ्‍या भावलहरी आम्‍हाला ग्रहण करता येऊ दे’, अशी प्रार्थना करतो. त्‍यानंतर सर्व जण एकत्रितपणे ध्‍यानस्‍थ शिवाची मानसपूजा करतो. ‘हे भगवान शिवशंभो, ‘तू आणि परात्‍पर गुरुमाऊली (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) एकच आहात’, असे आम्‍हाला वाटते. पहाटे उठून स्नान करून आम्‍ही तुझ्‍यासमोर पद्मासनात बसतो, तेव्‍हा तू ध्‍यानावस्‍थेत असतोस. आम्‍ही तुझ्‍या समोर सप्‍तसुरांचे आलाप घ्‍यायला आरंभ करतो, तेव्‍हा आमचे संगीत ऐकून तू तुझे नेत्र उघडून आमच्‍याकडे पाहून स्‍मित करतोस. भक्‍तांसाठी एवढ्या उच्‍च अवस्‍थेतून बाहेर येणार्‍या भगवान शिवाला आम्‍ही वंदन करतो.’

१ आ १ आ. सर्व प्रकारचे नाद नादब्रह्माकडे, म्‍हणजे भगवान शिवाकडे जाण्‍यासाठी आतुर झाले असून ते ‘शिवोऽहम् ।’, असे म्‍हणत आहेत’, असे जाणवणे : भगवान शिव आम्‍हाला संगीताविषयी मार्गदर्शन करत असतांना ‘तो काय सांगत आहे ?’, याकडे आमचे लक्ष नसते. आम्‍ही केवळ त्‍याच्‍या कपाळावरील भस्‍म आणि वार्‍याने उडणारी त्‍याची जटा, या त्‍याच्‍या सुंदर रूपाकडे पहात रहातो. मार्गदर्शन संपल्‍यावर शिव विचारतो, ‘कळलं का ?’ तेव्‍हा भगवान शिवाचे मनोहारी रूप पहातांना मंत्रमुग्‍ध होऊन ध्‍यान लागल्‍यामुळे आम्‍ही त्‍याला काही उत्तर देत नाही. ‘तिथे असलेली वाद्ये, त्‍यांचे झंकार, ताल, पानांची सळसळ, बांगड्या आणि घुंगरू यांंचे आवाज या सर्व नादांची त्‍या नादब्रह्माकडे म्‍हणजे शिवाकडे जाण्‍याची इच्‍छा असून ते सर्व नाद ‘शिवोऽहम् ।’, म्‍हणजे ‘मी शिव आहे’, असे म्‍हणत आहेत’, असे मला जाणवते.

१ आ १ इ. गाण्‍यातील ध्रुवपदाप्रमाणे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याकडे पुनःपुन्‍हा जाण्‍याची आणि त्‍यांच्‍या चरणी विलीन होण्‍याची ओढ लागणे : त्‍यानंतर मी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना प्रार्थना करते, ‘हे शिवस्‍वरूप गुरुमाऊली, तुम्‍ही गीतातील ‘ध्रुवपदा’प्रमाणे आहात. जसे एक पद झाल्‍यावर आपण परत ध्रुवपदाकडे येतो, तशी आम्‍हाला पुनःपुन्‍हा तुमच्‍याकडे येण्‍याची ओढ लागली आहे. जसे ध्रुवपदातील तिहाई (म्‍हणजे ध्रुवपदाच्‍या ओळीतील शेवटचे शब्‍द तीन वेळा गाऊन) घेऊन गाणे संपते, तसे आम्‍हाला तुमच्‍यात विलीन होता येऊन शिवानंदात मग्‍न होता येऊ दे.’

१ आ २. मनातील विचारांत झालेले पालट ! : पूर्वी मी कुठलीही मानसपूजा करतांना त्‍या देवतांना अलंकारादी शृंगार करणे, त्‍यांना भोजन देणे इत्‍यादी सर्व करायचे. आता मानसपूजा करतांना हे काहीच करायची इच्‍छा होत नाही. ‘केवळ ध्‍यानस्‍थ शिवाकडे पहात रहावे’, असे मला वाटते. या आधी मी श्रीकृष्‍णासंबंधी कथा आठवून त्‍यात रमत असे. आता ‘केवळ त्‍याचा नामजप करावा, त्‍याचे तत्त्व अनुभवावे’, असे मला वाटते. आता ‘मी सगुणातून पुढच्‍या टप्‍प्‍याला जात आहे’, असे मला वाटते.

१ इ. सौ. अनघा जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), बी. ए. संगीत,  महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

सौ. अनघा जोशी

१ इ  १. ‘शंकरा’ रागाची चीज म्‍हणतांना शिवाचे अंधुक दर्शन होऊन पुष्‍कळ चैतन्‍य जाणवणे आणि ‘गायन थांबवू नये’, असे वाटणे : ‘मी ‘शंकरा’ रागाची चीज म्‍हणत होते. तेव्‍हा शिवाचे अंधुक दर्शन होऊन मला पुष्‍कळ चैतन्‍य जाणवले. मला ‘गायन थांबवूच नये’, असे वाटत होते. मला एकेक स्‍वर प्रकाशमान वाटत होता. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘केवळ श्री गुरूंच्‍या संकल्‍पाने कार्य कसे होते ?’, हे संगीत सेवेच्‍या माध्‍यमातून देव मला शिकवत आहे.’

१ ई. कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे), भरतनाट्यम् नर्तिका, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. अपाला औंधकर

१ ई १. नटराजाच्‍या मूर्तीवर आधारीत लेख वाचतांना शिवावर काही ओळी सुचणे : ‘२०.१०.२०२२ या दिवशी  सायंकाळी मी नृत्‍यातील रचना हातांवर ताल देऊन म्‍हणण्‍याचा सराव करत होते. त्‍यानंतर मी नटराजाच्‍या मूर्तीवर असलेला एक लेख वाचू लागले. तेव्‍हा शिवाचे स्‍मरण होऊन मला नटराजाचे दर्शन झाले आणि आपोआपच काही ओळी सुचल्‍या.

१ ई १ अ. मला साक्षात् नटराज शिव शंकराची स्‍तुती असलेलेे गीत सुचले.

१ ई १ आ. हे गीत रचतांना आणि गातांना आलेल्‍या अनुभूती

१. मी हे गीत गाऊ लागल्‍यावर माझ्‍या आजूबाजूला थंडावा जाणवू लागला. माझे तळपाय थंड झाले.

२. माझ्‍या उजव्‍या हातावर असंख्‍य चंदेरी दैवी कण आले. त्‍यांचा आकार डमरूसारखा होता. त्‍यामुळे मला डमरूची आठवण झाली. ‘हातांवर आलेले दैवी कण जणू शिवलोकातूनच आले आहेत’, असे मला जाणवले. ते पुष्‍कळ तेजस्‍वी दिसत होते.

३. माझ्‍या डोळ्‍यांसमोर संपूर्ण पांढरा प्रकाश आल्‍यामुळे मी जणू शिवलोकातच आहे’, असे मला जाणवले.

४. वेळेचा विसर पडून मी निर्विचार स्‍थितीत गेले. नंतर माझा शिवाप्रती असणारा भाव जागृत झाला आणि संपूर्ण देहात थंडावा जाणवू लागला.

५. मी हे गीत खालच्‍या पट्टीत म्‍हणतांना थंडावा वाढत गेला आणि वरच्‍या पट्टीत म्‍हणतांना मला माझ्‍या मणिपूर आणि अनाहत चक्र येथे उष्‍णता जाणवली; परंतु वातावरण थंडच होते.

६. गीत म्‍हणण्‍याचे थांबवल्‍यावर थंडावा न्‍यून होत गेला. तो थंडावा १० मिनिटे टिकून होता.

१ ई १ इ. प्रार्थना आणि कृतज्ञता : ‘हे शिवस्‍वरूप गुरुमाऊली, नृत्‍यातून परमानंदाची अनुभूती देणारे केवळ आणि केवळ तुम्‍हीच आहात. तुम्‍ही ज्ञानस्‍वरूप आहात. मला प्रत्‍येक अनुभूती केवळ तुमच्‍याच कृपेने अनुभवता येते. यात माझे काहीच नाही परमेश्‍वरा ! ‘ही अनुभूती देऊन तुम्‍ही मला परमानंद दिला’, यासाठी आपल्‍या ब्रह्मांडव्‍यापी चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

२. नृत्‍यविषयक अनुभूती

२ अ. कु. अपाला औंधकर   (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे)

२ अ १. नटनम् (किर्तनम्) : ‘२५.१२.२०२१ या दिवशी ‘नटनम् आडिनार’ या शिवाच्‍या किर्तनम् वर नृत्‍याचा सराव करतांना ‘माझ्‍या पायांचा आपटण्‍याचा होणारा नाद हा माझ्‍या पायांचा नसून तो शिवाच्‍या चरणांच्‍या पदन्‍यासाचा आहे’, असे मला जाणवले. मला हे नृत्‍य करतांना पुष्‍कळ दम लागत होता; परंतु तरीही मला आनंद जाणवत होता. नंतर मला शांती जाणवू लागली.’

२ आ. कु. म्रिणालीनी देवघरे, भरतनाट्यम् नर्तिका, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा.

कु. म्रिणालिनी देवघरे

१.  ‘२२.४.२०१९ या दिवशी नृत्‍याच्‍या सरावाला जाण्‍याआधी माझा ‘शिव, शिव’ असा नामजप मनातल्‍या मनात चालू झाला.

२. सरावाच्‍या ठिकाणी पोचल्‍यावर मला आतून पुष्‍कळ आनंद जाणवत होता. मी ‘नटराज वंदना’ हे नृत्‍य केले. नंतर थोड्या वेळाने अकस्‍मात् माझा पुन्‍हा ‘शिव, शिव’ असा नामजप चालू झाला आणि या नामजपासह नृत्‍य करण्‍याची इच्‍छा माझ्‍या मनात जागृत झाली. नृत्‍य करतांना ‘मी ‘आनंद तांडव’ हे नृत्‍य करत आहे’, असे मला वाटत होते.

३. त्‍यानंतर बसून मानस नृत्‍य करतांनाही मला पुष्‍कळ आनंद जाणवत होता. थोड्या वेळाने मला दिसले, ‘सकाळची वेळ असून मी एका शिवमंदिरात आहे. माझ्‍यासमोर एक शिवलिंग असून मी त्‍याची पूजा करत आहे. त्‍या वेळी ‘माझ्‍यासमोर आसंदी नसून शिवलिंगच आहे’, असे वाटून माझे ध्‍यान लागले.

४.   ३.५.२०१९ या दिवशी नृत्‍याचा सराव करतांना आणि सराव झाल्‍यावर ‘माझे शरीर अन् मन पुष्‍कळ हलके झाले आहे’, असे मला जाणवले.

५. नृत्‍य करतांना शिवाची ‘ध्‍यानस्‍थ मुद्रा’ (दोन्‍ही हातांची तर्जनी आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडून पद्मासन घालून दोन्‍ही हात गुडघ्‍यांवर ठेवणे) केल्‍यावर मला पुष्‍कळ थंडावा जाणवत होता.’

–  सौ. अनघा जोशी, बी. ए. संगीत, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.२.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.