‘३.२.२०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) आणि संगीताशी संबंधित सेवा करणारे साधक यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. अजित कडकडे यांची श्री महालक्ष्मी देवस्थान (बांदोडा, गोवा) येथील भक्तनिवासस्थानी भेट घेतली.
१. श्री. अजित कडकडे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. नम्रपणा : आम्ही श्री. अजित कडकडे यांना संगीत साधनेविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केल्यावर ते नम्रपणे म्हणाले, ‘‘मला अध्यात्मातील काहीच कळत नाही. मी तुम्हाला काय सांगणार ? मी केवळ गातो. गातांना काही वेगळे अनुभवतो; पण मला ते शब्दांत सांगता येत नाही.’’
१ आ. निरपेक्ष भावाने गायन करणे : ते म्हणाले, ‘‘मी गाणे म्हणायला लागल्यावर मला त्यातील सकारात्मक ऊर्जा आपोआप मिळते; मात्र ‘सकारात्मक ऊर्जा मिळावी’, यासाठी ठरवून गायला लागल्यावर ती मिळत नाही. कुठेतरी ती थांबते. त्यामुळे मी त्याचा विचारच करत नाही. मी सगळे सोडून देतो आणि तेव्हा सकारात्मक ऊर्जा आपोआपच मिळते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.’’
१ इ. अहं अल्प असणे : त्यांनी गायलेल्या भक्तीगीतांत पुष्कळ आर्तता जाणवते. त्याविषयी त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तेव्हा काय होते ?’, ते मलाही कळत नाही; पण त्यासाठी मी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. गाण्यात ती आर्तता आपोआप येते.’’
१ ई. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांप्रती भाव : ते आम्हाला म्हणाले, ‘‘आपण या ठिकाणी आलात. आपल्या माध्यमातून ईश्वरी तत्त्वच या ठिकाणी आले आहे’, असे मी मानतो.’’
२. श्री. अजित कडकडे यांनी अध्यात्माविषयी सांगितलेले काही मौलिक विचार आणि त्यांच्या साधनाप्रवासातील अनुभव !
अ. पूर्वी मला तीर्थक्षेत्री जाण्याची पुष्कळ ओढ असायची आणि ‘तीर्थक्षेत्री जावे’, असे पुष्कळ वाटायचे. आता तसे वाटणे हळूहळू न्यून झाले आहे; मात्र ‘मंदिरांमध्ये आणि तीर्थक्षेत्री जाणे’, हा साधनेतील पहिला टप्पा आहेच. ते चूक नाही.
आ. ‘प्रत्येक प्राणीमात्रामध्ये चैतन्य आहे. आता ‘ते चैतन्य अनुभवावे’, असे मला वाटते. सद्यःस्थितीत माझे अध्यात्म पालटले आहे. पूर्वी सगळे बाह्य बघितले जायचे. आता अंतरंगात थोडे थोडे लक्ष जात असल्याने ‘बाह्य दृष्टी न्यून होऊ लागली आहे’, असे मी अनुभवत आहे.
इ. हे सगळे अध्यात्मातील पुढचे पुढचे टप्पेच आहेत; मात्र हे टप्पे आपण ठरवून करू शकत नाही. ते आपल्या हातात नाही. हे दैवी शक्तीच्या प्रेरणेनेच होते. त्यामुळे एखादा टप्पा पार करायला कधी ४ दिवस लागतात, तर कधी ५ वर्षेही लागू शकतात.
ई. मी दत्तगुरूंची पुष्कळ गाणी गायली आहेत; परंतु ‘गुरुचरित्राचे पारायण करावे’, असे मला कधीच वाटले नाही. ‘माझी ती साधना या भक्तीगीतांच्या गायनातूनच झाली’, असे मला वाटते.
(‘गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे दत्तगुरूंचा महिमा श्री. कडकडे यांनी दत्तगुरूंवरील अनेक गीते भावपूर्ण गाऊन अनुभवला आहे. त्यामुळे त्यांना वेगळे पारायण करावे लागले नाही.’ – संकलक)
उ. देवाच्या अस्तित्वाविषयी श्री. कडकडे म्हणाले, ‘‘देव देव्हार्यात नाही’, हे गाणे चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने लिहिले आहे; पण देव मंदिरामध्ये आहेच. तो सर्वव्यापी आहे, तर मंदिरातही तो आहेच; परंतु ‘तो केवळ मंदिरात आणि मूर्तीतच आहे’, असे नाही. पहिल्या टप्प्याला मूर्ती हवीच; नाहीतर लोक भरकटतील.’’
३. श्री. अजित कडकडे यांची श्री गुरूंवरील श्रद्धा !
मी (कु. तेजल यांनी) एका संशोधनाच्या वेळी केलेले गायन त्यांना ऐकवल्यावर त्यांच्याशी झालेला संवाद येथे दिला आहे.
श्री. कडकडे : तुझा आवाज छान आहे !
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : अनेक वर्षे सराव नसूनही श्री गुरूंच्या कृपेमुळे गायन चांगले होत आहे.
श्री. कडकडे : खरोखर ही आपल्यावरील श्री गुरु आणि आई-वडील यांची कृपाच असते. त्यांच्या कृपेविना आपण पुढे चालू शकत नाही.
४. श्री. अजित कडकडे यांनी वैज्ञानिक उपकरणांद्वारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेले संशोधनाचे कार्य जिज्ञासेने समजून घेणे
या भेटीत आम्ही श्री. अजित कडकडे यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय वैज्ञानिक उपकरणांद्वारे संगीताविषयी (गायन, वादन आणि नृत्य यांविषयी) करत असलेल्या संशोधन कार्याची माहिती ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन’च्या (टीप) माध्यमातून दिली. श्री. अजित कडकडे यांनी अतिशय जिज्ञासेने संगीत संशोधनाचे कार्य समजून घेतले.
टीप – ही एक संगणकीय प्रणाली असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवता येतात.
‘पुरेशी विश्रांती झाली नसूनही श्री. कडकडे यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संगीत संशोधनाचे कार्य जाणून घेतले’, याबद्दल महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (६.२.२०२३)
श्री. अजित कडकडे यांनी प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले उद्गार !
१. ‘आम्ही श्री. अजित कडकडे यांना प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटलेल्या भजनांवरील एक संशोधनात्मक प्रयोग ऐकवला. त्यावर ते म्हणाले, ‘‘मी यांना ओळखतो. इंदूर (मध्यप्रदेश) आणि कांदळी (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) येथील त्यांच्या आश्रमामध्ये गायन करण्याची संधी मला लाभली आहे.’’
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे कार्य थोरच आहे. मी त्यांनाही ओळखतो. त्यांना माझा साष्टांग नमस्कार सांगावा. मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात नक्की येईन.’’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संगीत संशोधनाचे कार्य पाहून श्री. अजित कडकडे यांनी काढलेले गौरवोद्गार !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेले संशोधनाचे कार्य पुष्कळ चांगले आहे. या माध्यमातून तुम्ही पाया सिद्ध केला आहे. तुम्ही ‘सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजमाप करून दाखवत आहात’, हे चांगले आहे. ‘प्रेक्षागारात (‘ऑडिटोरियम’मध्ये), मंदिरांमध्ये किंवा संतांच्या समोर गाणे म्हणणे’, यांमध्ये पुष्कळ भेद आहे. ‘या सगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्पंदने जाणवतात’, हे खरेच आहे. मी स्वतःही हे अनुभवले आहे; पण मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. ‘तुम्ही ते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करून दाखवू शकत आहात’, हे पुष्कळ चांगले आहे. तुमचे संशोधन पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (६.२.२०२३)